यंदाच्या महापुराने सन २०१९ पेक्षा कृष्णा – पंचगंगा नदीचे पाणी पातळी आणि विस्तारही वाढला आहे. त्यापासून होणारे धोके निदर्शनास आले असल्याने महापुराच्या लाल – निळ्या रेषा जलसिंचन विभागाकडून नव्याने आखण्यात येईल, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केले.
कोल्हापूर आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोशिएशनच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, महापुराची वाढती पातळी पाहता नगर आराखड्याचे नवे परिमाणे निश्चित केली पाहिजेत. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात मोठा विस्तार होत आहे. नागरीकरणाचा हा वेग लक्षात घेऊन हे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले म्हणाले, ”नद्याचे पात्र उथळ झाले आहे. ते रुंद होण्याचे नियोजन झाले पाहिजे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार नाही तोवर महानगरपालिका म्हणून विकास होणार नाही. गरज असेल तर कागल शहराचाही महापालिका हद्दवाढी मध्ये समावेश केला पाहिजे. प्राधिकरण हे केवळ नावापुरते उरले आहे.”
पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, महापूराचा धोका हा सातत्याने उद्भवणार असल्याने नजीकच्या आणि दिल दीर्घकाळातील नियोजन करण्याची गरज आहे, त्यासाठी बांधकाम व्यवसायातील अभ्यासकांनी सूचना कराव्यात. नाले –ओढे यांच्या विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, उपाध्यक्ष विजय चोपदार, सचिव राज कांबळे उपस्थित होते.