राज्याचे स्वार्थी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सिंचन योजनांच्या निधीवर डल्ला मारल्यानेच दुष्काळी भागातील पाणी प्रकल्प रखडले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जत येथे झालेल्या प्रचारसभेत केली.
महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ श्री. फडणवीस यांची जाहीरसभा जतच्या गांधी चौकात आयोजित करण्यात आली होती. या वेळी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बसवगोंडा पाटील, आमदार प्रकाश शेंडगे, आमदार सुरेश खाडे, विलासराव जगताप, मकरंद देशपांडे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला असून एवढा निधी जर दुष्काळी भागातील पाणी योजनांवर खर्च झाला असता, तर  दुष्काळ हटला असता. युती शासनाने ताकारी-म्हैसाळ योजनांची ८० टक्के कामे पूर्ण केली होती. मात्र उर्वरित २० टक्के कामे आघाडी शासनाला गेल्या १५ वर्षांत पूर्ण करता आली नाही. दुष्काळी जनतेला पाण्यासाठी टाहो फोडावा लागतो हे आघाडी शासनाचेच पाप आहे. गृहमंत्री केवळ पोपटराव पाटील असून त्यांच्या बोलघेवडेपणामुळे राज्यातील गुन्हेगारी फोफावली आहे. जनतेने केंद्रात मोदी सरकारला आणि राज्यात महायुतीला साथ दिली, तर एक वर्षांत जतचा पाणी प्रश्न निकाली काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader