राज्यातील जलसिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी शासनाने कालबद्ध व सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्यात ६० हजार कोटींचे जलसिंचन प्रकल्प अपुरे असून ते केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तीन वर्षांमध्ये पूर्ण केले जाणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.
कोल्हापूर पाटबंधारे मंडळाच्या दूधगंगा पाटबंधारे प्रकल्पाच्या दूधगंगा डाव्या कालव्याचे जलपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते ठिकपुर्ली (ता.राधानगरी) येथे करण्यात आले. यानंतर शेळेवाडी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
सभेत बोलताना पवार यांनी भाजपचा समाचार घेतला. खोटे बोला, पण रेटून बोला अशी भाजपच्या कुटील राजकारणाची पद्धत आहे, असा उल्लेख करून ते म्हणाले, भाजपला जळीस्थळी भ्रष्टाचार दिसतो. राज्यातील आघाडी सरकारने भ्रष्टाचार केल्याची टीका भाजपकडून सतत होत असते. मात्र भ्रष्टाचाराला खरा कारणीभूत भाजपच आहे. त्यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच कर्नाटकातील जनतेने सत्तेतून हटविले. लालकृष्ण अडवानी यांनी कशासाठी राजीनामा दिला हे जनता ओळखून आहे. या प्रश्नावरून भाजपने आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
राज्यातील जल नियोजनाची भूमिका मांडताना पवार म्हणाले, सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे मोठय़ा प्रकल्पाचे महत्त्व खूपच वाढले आहे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी दुष्काळी भागातील प्रकल्पांना प्राधान्याने चालना देण्याची शासनाची भूमिका आहे. राज्यातील पाणी महाराष्ट्रात प्रथम अडविले जावे या हक्कापोटी ५९५ टीएमसी पाण्यावर राज्याने हक्क प्रस्थापित केला आहे. दूधगंगा प्रकल्पहा आंतरराज्य प्रकल्प आहे. याचा लाभ महाराष्ट्राला ८५ टक्के व कर्नाटकाला १५ टक्के होणार आहे. या प्रकल्पातील ६ टीएमसी पाणी पिण्यासाठी व १६ टीएमसी शेतीसाठी आरक्षित केले आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी शाहूमहाराजांनी राधानगरी धरण बांधून जिल्हय़ाचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्याच कार्याचा वारसा राज्य शासन पुढे चालवीत आहे. धामणी धरण हे जिल्हय़ातील महत्त्वाचे धरण असून त्यासाठी निधी उपलब्ध केल्यास ८०० एकर जमीन ओलिताखाली येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार संध्यादेवी कुपेकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, माजी आमदार नामदेवराव भोईटे, अधीक्षक अभियंता खलील अन्सारी, धैर्यशील माने, संग्रामसिंह कुपेकर, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर उपस्थित होते.
मोदींपेक्षा अजितदादा उजवे
कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुणगौरवाची मुक्ताफळे उधळली. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर सरस ठरतील, असे मत मांडले. गुजरातपेक्षा महाराष्ट्राचा विकास अधिक प्रमाणात कसा होईल याचे विवेचनही मुश्रीफ यांनी केले. या तुलनेची कार्यक्रमानंतर कार्यकर्ते, नागरिकांत चर्चा सुरू होती.
येत्या तीन वर्षांत साठ हजार कोटींचे अपुरे जलसिंचन प्रकल्प पूर्ण करणार- अजित पवार
राज्यातील जलसिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी शासनाने कालबद्ध व सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्यात ६० हजार कोटींचे जलसिंचन प्रकल्प अपुरे असून ते केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तीन वर्षांमध्ये पूर्ण केले जाणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.
First published on: 23-06-2013 at 12:15 IST
TOPICSपूर्ण
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrigation project will complete in next 3 years of rs 60 thousand crore ajit pawar