Raigad landslid : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री दरड कोसळली. या गावातील २५ ते ३५ घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावातील १०० ते १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज सुरुवातीला बचाव पथक आणि पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यापैकी १०३ लोकांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अजूनही काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्य सुरूच राहील, असंही त्यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेला आता १७ तास उलटले आहेत. मध्यरात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. खालापूर परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बचाव पथकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. एनडीआरएफच्या बचाव पथकांसह पनवेल महापालिकेचं बचाव पथक, सिडकोचे मजूर स्थानिक ट्रेकर्सचे समूहदेखी इर्शाळवाडीत मदतकार्य करत आहेत. तसेच आज (२० जुलै) पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदिती तटकरे ही नेतेमंडळीदेखील इर्शाळवाडीत दाखल झाली आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी आतापर्यंत बचावपथकांनी केलेल्या कामाची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत १०३ लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आलं असून या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. तसेच या गावातील जे लोक कामानिमित्त बाहेर पडले होते, त्यांचाही शोध घेतला जात आहे. भातलावणीसारख्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आश्रमशाळेत जी मुलं आहेत, त्यांचीही माहिती घेतली जात आहे.

हे ही वाचा >> पायाखाली पक्का रस्ता नाही, वरून पावसाला खंड नाही… रायगड दरड दुर्घटनेत बचाव पथकांसमोर आव्हानांचा ‘डोंगर’!

हे ही वाचा >> Raigad Landslide: ..आणि शाळकरी मुलांमुळे गाव जागा झाला! प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं ठाकूरवाडीत नेमकं काय घडलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही खूप दुर्दैवी घटना आहे. मी आतापर्यंत अनेकांच्या नातेवाईकांना भेटलो आहे. सरकार त्यांच्या पाठिशी आहे, असा विश्वास मी त्यांना दिला. जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत केली जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irshalwadi landslide 12 dead 103 people rescued says cm eknath shinde asc
Show comments