महाडच्या पूल दुर्घटनेनंतर जाग आलेल्या प्रशासनाकडून सांगलीजवळील ८६ वर्षे वयोमानाचा आयर्विन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्याचे दगड निसटले आहेत, तसेच त्यावर झाडेही उगवली आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वाहतूक नियंत्रण, परिवहन विभागाचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यामध्ये अवजड वाहनांना या पूलावरून वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २४ तासांत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
पुण्याला जाण्यासाठी संस्थानकाळात सांगलीच्या गणेश मंदिराजवळ सांगली संस्थानने कृष्णा नदीवर पुलाची उभारणी केली. या पुलाचे उद्घाटन १८ नोव्हेंबर १९२९ रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल लार्ड बॅरन आयर्विन व त्यांच्या पत्नी लेडी आयर्विन यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलासाठी संस्थानने सहा लाख रूपये खर्च केला होता. संस्थानचे अभियंते व्ही. जी. भावे, व्ही. एन. वर्तक आणि मेसर्स व्ही. आर. रानडे अॅण्ड सन्स यांनी या पुलाची उभारणी केली.
सांगली शहरालगत उभारण्यात आलेल्या आयर्विन पुलाची लांबी ८२० फूट आणि रूंदी ३२ फूट आहे. पुलाची उंची ७० फूट असून आर्च पद्धतीने या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. पुलाचे आयुष्य संपल्याने या पुलावरून वाहतूक बंद करण्याबाबत विचार सुरू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाची उभारणी बांधा, वापरा व हस्तांतरित करा या योजनेतून केली.
मात्र नवीन पुलावर जाण्यासाठी किमान चार ते पाच किलोमीटर अंतर जादा पडत असल्याने याच पुलावरून वाहतूक सुरू राहिली. या पुलावरून महापालिकेने सांगलीवाडीसाठी पिण्याच्या व ड्रेनेजसाठी सव्वा फूट व्यासाच्या नलिका टाकलेल्या आहेत. याशिवाय संरक्षक लोखंडी बॅरिकेटसही जीर्ण झाले आहेत. पुलाचा पायाही अखंड वाळू उपशामुळे उघड झाला असल्याने पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या दगडी बांधकामामध्ये वड व पिंपळाची झाडे उगविली असल्यामुळे बांधकामाला भेगाही काही ठिकाणी पडल्या असल्याने पुलावरील वाहतूक धोकादायक ठरली आहे. त्यापार्श्वभूमीवर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा