मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार दोन दिवस ‘नॉट रिचेबल’ असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती. अजित पवार लवकरच आपल्या पक्षातील ४० आमदारांना घेऊन भाजपाला पाठिंबा देणार, असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. या सर्व घडामोडीनंतर अजित पवारांनी स्वत: प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीबरोबरच काम करणार, असं अजित पवार म्हणाले.
यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित पवार आज पुन्हा गायब झाले वाटतं, असं मिश्किल टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं.
खरं तर, आज पुण्यात कालवा समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि इतर मंडळी उपस्थित राहणार होती. पण अजित पवार या बैठकीला गैरहजर राहिले. कालवा समितीच्या बैठकीला जाण्यापूर्वी चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना टोला लगावला.
हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का? फडणवीसांनी पाच शब्दांत दिलं उत्तर, म्हणाले…
कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी कारमधून उतरताना उपस्थित अधिकाऱ्यांना विचारलं “अजितदादा आलेत का? यावर अधिकारी म्हणाले, नाही आले… अजितदादांसाठी मी धावत पळत आलो.” यानंतर चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलं की,”आज पुन्हा गायब झाले वाटतं.”