काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी कायम शरद पवारांबरोबरच राहणार, अशी भूमिका जयंत पाटील यांनी घेतली. यानंतर आता स्वत: जयंत पाटील हेच महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एवढंच नव्हे तर जयंत पाटील यांनी गुपचूप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे, अशा बातम्याही समोर येत आहेत. या सर्व घडामोडींनंतर जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझी अमित शाहांशी भेट झाली नाही. मी मागील तीन दिवसांपासून पक्षाच्या कामानिमित्त शरद पवारांची सलग भेट घेत आहे. आजही मी शरद पवारांची भेट घेतली आहे. प्रसारमाध्यमांतून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे माझी करमणूक होत आहे, असं विधान जयंत पाटील यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- सरकारचा जाहिरातबाजीवर दिवसाला २० लाख रुपये खर्च; रोहित पवारांनी शेअर केली आकडेवारी, म्हणाले…

तुम्हाला भाजपाने ऑफर दिली आहे का? या प्रश्नावरही जयंत पाटलांनी उत्तर दिलं आहे. भाजपाने दिलेल्या ऑफरबद्दल जयंत पाटलांनी थेट खुलासा केला नसला तरी माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. मी दररोज शरद पवारांना भेटत आहे, असं उत्तर त्यांनी दिलं.

हेही वाचा- “एक रुपयाही निधी देणार नाही”; अजित पवारांनी दिलेल्या चॅलेंजबाबत गिरीश महाजनांकडून मोठा खुलासा, म्हणाले…

यावेळी जयंत पाटील म्हणाले, “माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. मी शरद पवारांना रोज भेटत आहे. आमचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्यही शरद पवारांची भेट घेत आहेत. पण कालपासून मी महायुतीत जाणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. त्या बातम्या मोबाईलवरही येत आहेत, यामुळे माझीही करमणूक होत आहे. या करमणूकीत आज सकाळी भर पडली. त्यानंतर दुपारी आणखी भर पडली. ही करमणूक महाराष्ट्रातील जनतेमध्ये माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारी आहे. मी काल शरद पवारांकडे होतो. त्यानंतर रात्री माझ्या घरी काही आमदार आले होते. त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा झाली. आज सकाळी पुन्हा मी शरद पवारांना भेटायला गेलो होतो. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवणं योग्य नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is bjp gave offer to join mahayuti jayant patil give answer rmm
Show comments