राज्यात सध्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरण चांगलंच गाजत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अलीकडेच शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले. जितेंद्र आव्हाडांचा संशयित ड्रग्स तस्करांशी संबंध असल्याचा मोठा दावा मनीषा कायंदे यांनी केला. तसेच, विविध संशयित ड्रग्स तस्करांसोबत असलेले आव्हांडांचे फोटोही त्यांनी प्रसारमाध्यमांना दाखवले.
यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे पाच दिवसांपूर्वी जुगारी आणि घोटाळेबाजांच्या घरी गेले होते, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच संबंधित प्रकरणावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी बोलावं, अशी मागणीही आव्हाडांनी केली.
हेही वाचा- गुणरत्न सदावर्ते भाजपाचा माणूस? रावसाहेब दानवेंचं मोठं विधान, म्हणाले…
‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच दिवसांपूर्वी गृहनिर्माण घोटाळ्यातील जुगारी व घोटाळेबाज आणि छोटा राजनचा जवळचा सहकारी पराग संघवीच्या घरी भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पराग संघवी यांच्या निवासस्थानी भेट देतानाचे हे फोटो आहेत. मनीषा कायंदे कृपया तुम्ही यावर काही बोलाल का?”
मनीषा कायदे यांनी नेमका काय आरोप केला होता?
मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाडांचा संशयित ड्रग्स तस्करांशी संबंध असल्याचा मोठा दावा केला होता. विविध संशयित ड्रग्स तस्करांसोबत असलेले आव्हांडांचे फोटोही माध्यमांना दाखवले. तसेच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. शानू पठाण, सलमान फाळके या ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपींची जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचा संबंध असल्याचा दावा त्यांनी केला होता.