अजित पवारांसह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता काँग्रेसचे काही आमदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय जनता पार्टीकडे दुसऱ्यांची घरं फोडणं, एवढंच आयुध आहे. ईडी-सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. भ्रष्टाचार हा भाजपाच्या रक्तात भिनलेला डीएनए आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा- मोठी अपडेट: शरद पवारांच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या ‘त्या’ आमदाराचा अजित पवारांना पाठिंबा
“भ्रष्टाचार हा भाजपाच्या रक्तात भिनलेला डीएनए”
राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचे काही आमदारही भाजपाच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तेही लवकरच भाजपात जातील, असं बोललं जात आहे, याबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “भाजपाला याशिवाय दुसरं काही काम येत नाही. त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बोलायला हवं. एकीकडे मणिपूर जळत असताना देशाचे पंतप्रधान काहीही बोलायला तयार नाहीत. मणिपूरमध्ये भाजपाचं कुणीही गेलं तर लोक त्यांना पकडून मारत आहेत, याचे व्हिडीओजही समोर येत आहेत. हीच परिस्थिती संपूर्ण देशात निर्माण होणार आहे. दुसऱ्यांची घरं फोडणं एवढंच आयुध भाजपाजवळ आहे. ईडी-सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडण्याचं काम ते करत आहेत. भ्रष्टाचार हा भाजपाच्या रक्तात भिनलेला डीएनए आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.”
हेही वाचा- मोठी अपडेट: महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान
“कर्नाटकच्या लोकांनी भाजपाला जागा दाखवली”
“याचं उदाहरण म्हणजे कर्नाटकचे तत्कालीन भाजपाचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री ४० टक्के कमिशन घ्यायचे, अशी तक्रार होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच भ्रष्टाचारी लोकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी फिरत राहिले. त्यामुळे कर्नाटकच्या लोकांनी त्यांना जागा दाखवली आहे. भ्रष्टाचार हा भाजपाच्या रक्तात आणि विचारात आहे, हे आता सिद्ध झालं आहे. भ्रष्टाचारी लोक जमा करून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा जो संकल्प भाजपाने केला आहे, त्याला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीका नाना पटोलेंनी केली.