शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. बंडाळी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत, असा दावा करत आहेत. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे, त्यांना धनुष्यबाण बळकावयाचा आहे, असे अनेक आरोप-प्रत्यारोप राजकीय वर्तुळात केले जात आहेत.
या आरोपांवर बंडखोर आमदार उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. ते पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. संबंधित प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, “दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यात एक जागा आम्ही शिवसेना म्हणून लढवली होती. तर उर्वरित चार जागा आमचे घटक पक्ष लढले. या निवडणुकीत घटक पक्षाच्या चारही जागा निवडून आल्या. मात्र शिवसेनेची एक जागा पराभूत झाली. पराभूत झालेल्या जागी जे अपक्ष उमेदवार निवडून आले होते, त्यांनी निवडणुकीनंतर ८ दिवसांत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.”
हेही वाचा- “…तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा धमकीवजा इशारा
“राज्यसभा निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना आम्ही ४२ मतांचा कोटा दिला होता. पण काँग्रेसचा कोटा ४४ वर गेला, राष्ट्रवादीचा कोटा ४३ वर गेला आणि तीन मतांनी संजय पवारांचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही जो उठाव केला आहे, तो शिवसेनेच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी केलेला उठाव आहे” असंही उदय सामंत म्हणाले.
हेही वाचा- “आम्ही ५० जण बळी पडणार नाही” उदय सामंतांचं विरोधकांना प्रत्युत्तर, म्हणाले…
पुढे स्पष्टीकरण देताना सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी कुठेही सांगितलं नाही की, मला शिवसेना ताब्यात घ्यायची आहे, मला शिवसेनेचा धनुष्यबाण ताब्यात घ्यायचा आहे, मला पक्षप्रमुख व्हायचंय. त्यामुळे हा गैरसमज व्हायला नको. आम्हा ५० जणांसोबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी अशी कुठेही चर्चा केलेली नाही, हे कुणीतरी केलेलं षडयंत्र आहे.”