शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या निर्णयानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला आहे, असं म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिलं आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले “आमच्याकडे बहुमत असल्याने चिन्ह आणि पक्षाचं नाव आमच्या बाजूने असायला हवं होतं. परंतु हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. कारण, मूळ शिवसेना आम्ही आहोत. आयोगाने असा निर्णय घ्यायला नको होता. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला द्यायला पाहिजे होतं. अशी आमची मागणी होती. परंतु ठीक आहे आम्ही ही लढाई लढू, आमची बाजू मांडू आणि कालांतराने आम्हाला ते मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.”

तर विरोधकांकडून गद्दारांनी शिवसेनेचं नावही पळवलं असं म्हणत शिंदे गटावर टीका केली जात आहे. या टीकेला खोतकर यांनी प्रत्युत्तर देताना “बोलण्यामुळे तर एवढं वाढलेलं आहे. त्यांनी अजूनही आत्मचिंतन करावं. एवढी लोकं तुम्हाला सोडून गेलीत, याला तुमचं अपयश म्हणायचं नाही का? ४० आमदार सोडून जातात, १८ पैकी १२ खासदार जातात हे तुमचं अपयश नाही का? हे कोणाचं अपयश आहे.” असाही प्रश्न उपस्थित केला.

PHOTOS : शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर महाराष्ट्रातील नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया

याशिवाय “जर तुम्ही अजुनही आत्मचिंतन करायला तयार नसाल तर मग हे फार गंभीर होईल. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी चांगलं काम करावं, जनतेत जावं. आता या निमित्ताने तरी जनतेत जायला लागले ही चांगली गोष्ट आहे. आनंद आहे आम्हाला.” असं शेवटी खोतकर यांनी म्हटलं.

तर ठाकरे गटामुळेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवले. या निर्णयामुळे आमच्यावरच अन्याय झाला असून, इतरांनी गळा काढू नये. बहुमत असूनही आमचा दावा नाकारला गेल्याने आम्ही आयोगापुढे दाद मागू, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि उदय सामंत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.