“राज्यातील ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का?”, असा बोचरा सवाल उपस्थित करत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यातील ‘दहीहंडी’ उत्सवावर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. “महाराष्ट्रात सगळ्या हिंदू सणांवरच इतके निर्बंध लागू का केले जात आहेत? राज्यातील ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येत आहेत का?”, असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी यावेळी थेट शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. “शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करत आहे”, असा दावा देखील शेलार यांनी केला आहे. त्याचसोबत, मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवाच्या वेळी थरांची मर्यादा निश्चित केली तेव्हा हाच पक्ष सर्वात जास्त आरडाओरड करत होता असं म्हणत शिवसेनेला डिवचलं आहे. यावेळी शेलार पुढे म्हणाले की, थरांची उंची आणि गर्दीबाबतचे निर्बंध पाळून दहीहंडी साजरा करण्याला देखील सरकारने परवानगी नाकारली आहे.
भाजपा साजरी करणार प्रतिकात्मक दहीहंडी
“काही वर्षांपूर्वी जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून एका जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीत तत्कालीन सरकारला दहीहंडीच्या थरांच्या उंचीवर मर्यादा घालण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा शिवसेनेने मोठा गोंधळ घातला होता. त्यावेळी शिवसेनेने विचारलं होतं कि, आता भारतात सण-उत्सवांवर असे निर्बंध लादले गेले तर आम्ही पाकिस्तानात जाऊन दहीहंडी साजरी करायची का? असा सवाल केला होता”, अशी आठवण आशिष शेलार यांनी यावेळी करून दिली. दरम्यान, सरकारने घातलेल्या बंदीनंतर भाजपाने दहीहंडीचा उत्सव प्रतिकात्मकपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मनसे’ही आक्रमक
भाजपासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील राज्य सरकारला इशारा दिला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले कि, “आमच्या उत्सवावर सरकारने मर्यादा का घातली? आम्ही सर्व करोना मार्गदर्शक सूचनांचं पालन करून आमचा उत्सव आनंदाने साजरा करू शकतो. आता शांततेने सण साजरा करण्यास देखील नकार देणारं हे कोणत्या प्रकारचं सरकार राज्यात आहे?”
अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवावर बंदी घातली. याच पार्श्वभूमीवर मनसेने यंदा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची भूमिका घेत ठाण्यामधील भगवती मैदानामध्ये आज (३० ऑगस्ट) सकाळपासून आंदोलन सुरु केलं. मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या या आंदोलनात ठाणे पोलिसांनी काही वेळापूर्वी अविनाश जाधव आणि ठाणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी, अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून “उद्धव ठाकरे हाय हाय” अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली.