सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबद्दल मोठं भाष्य केलं. मंत्रालयातील एका सूत्राच्या हवाल्याने त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील १५ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर सत्ता स्थापन करतील, असा दावा अंजली दमानिया यांनी ट्वीटद्वारे केला.
अंजली दमानिया यांच्या ट्वीटनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, बुधवारी अजित पवारांनाही याबाबत उत्तर देणं टाळलं आहे. “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा लहान कार्यकर्ता काय बोलणार?” असं विधान करत अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाबरोबर जाणार की नाही? याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
हेही वाचा- परळीतील वैद्यनाथ कारखान्यावरील कारवाईनंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणार का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, “मला माहीत नाही.” शरद पवारांनीही थेट प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य सत्तांतराबद्दल संशय आणखी गडद होताना दिसत आहे.
हेही वाचा- मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “आम्ही…”
दरम्यान, बुधवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार अनुपस्थित होते. याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, “बैठकीच्या दिवशी मी दिल्लीत नव्हतो. मला बोलावलं होतं. पण मला आज आणि उद्या इथे काही कामं होती. त्यामुळे मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेईन.”