जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांची मंत्रिपदावरूनच गच्छंती झाल्याने आता प्रदेशाध्यक्षपद की लोकसभा निवडणूक याविषयी जिल्ह्य़ात चर्चेला उधाण आले आहे. जिल्ह्य़ात एकीकडे त्यांचे मंत्रिपद काढून घेतानाच प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांना मंत्रिमंडळात संधी देऊन राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे पक्षीय पातळीवर जिल्ह्य़ाचा समतोल राखला आहे. मात्र जिल्ह्य़ात सत्तेचे असंतुलन झाले आहे. आता तिन्ही मंत्रिपदे उत्तरेत गेली असून तेही, तिघे एकाच भागातील म्हणजे राजकीयदृष्टय़ा संवेदनशील प्रवरा पट्टय़ातील आहेत. पाचपुते यांचे मंत्रिपद गेल्याने त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या मार्गातही अडथळेच अधिक येण्याची शक्यता व्यक्त होते. ते स्वत:ही आता लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे समजते.
राष्ट्रवादीतील खांदेपालटात जिल्ह्य़ाचे पाचपुते यांना पक्षबांधणीसाठी राज्याचे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्रिपद सोडावे लागले. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्य़ात याविषयी चर्चा सुरू होती. मात्र प्रत्येक वेळी पाचपुते यांनी अंतर्गत विरोधकांवर मात करीत ही चर्चा फोल ठरवली. मात्र आता पक्षातील पाचपुते विरोधकांना आनंदाचे भरते आले आहे. प्रस्थापितांपासून काहीसे फटकून वागणारे पाचपुते यांनी पालकमंत्रिपदाच्या माध्यमातून जिल्ह्य़ात विशेषत: दक्षिण भागात मोठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. चिरंजीव विक्रमसिंह यांच्यासाठी त्यांची नगर लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू होती. त्याला आता मर्यादा पडण्याचीच चिन्हे आहेत.
पालकमंत्री या नात्याने पाचपुते यांनी जिल्ह्य़ात अनेक धाडसी निर्णय घेतले, मात्र प्रस्थापितांशी त्यांची फारशी नाळ जुळू शकली नाही. सुरुवातीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू अशीच त्यांची पक्षातील ओळख होती. पुढे म्हणजे मागच्या चार वर्षांत त्यांनी छोटे पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध कमी करून त्यांचाही विश्वास संपादन केला. त्यामुळेच राज्यात तिस-यांदा काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर पिचड यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला बाजूला ठेवून पाचपुते मंत्रिमंडळात प्रवेशकर्ते झाले. मागच्या तीन, साडेतीन वर्षांत त्यांनी पालकमंत्रिपदाची छाप मात्र निश्चित पाडली. अगदी सुरुवातीचे‘व्हिजन-२०२० असेल, मग तलावांमधील गाळ काढण्याची मोहीम व अलीकडे वर्षभरात नरेगाच्या माध्यमातून ते सतत चर्चेत राहिले. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पक्षीय पातळीवरही पक्षाच्या भव्यदिव्य जिल्हा कार्यालयाची उभारणी, जिल्हा परिषदेतील सत्तेची पायाभरणी याही गोष्टी त्यांच्या जमेला होत्या.
नगर शहराच्या दृष्टीने विचार केला, तर शहरात लक्ष घालणारा पहिलाच पालकमंत्री असाच पाचपुते यांचा उल्लेख करावा लागेल. गेल्या पाच, पंचवीस वर्षांत एकाही पालकमंत्र्याने नगर शहराला कधीच गांभीर्याने घेतले नाही. एकतर शहरावर असलेला शिवसेनेचा प्रभाव आणि सामंजस्याचा अभाव यामुळे काँग्रेसच्या जिल्ह्य़ातील कुठल्याच नेत्याने शहराकडे लक्ष दिले नाही. ही उणीव पाचपुते यांनी प्रभावीपणे भरून काढली. शहरातील अतिक्रमण मोहीम व महानगरपालिकेच्या अन्य प्रश्नांमध्ये त्यांनी सकारात्मक लक्ष घातले होते. त्यातील काही विषय त्यांनी पक्षीय अभिनिवेष बाजूला ठेवून मार्गी लावले. काही प्रश्नांमध्ये मात्र त्यांनाही अपयश आले. भुईकोट किल्ल्याचे रखडलेले सुशोभीकरण, दौंड रस्त्यावरील प्रस्तावित औद्योगिक वसाहत, स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपूल असे महत्त्वाचे विषय अखेर प्रलंबितच राहिले, मात्र त्याचा दोष पाचपुते यांना देता येणार नाही. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते.
पाचपुते यांना जिल्ह्य़ात पक्षांतर्गत विरोधकच अधिक आहेत. अलीकडे जवळ आलेले आमदार चंद्रशेखर घुले आणि जुने मित्र, माजी आमदार भानुदास मुरकुटे वगळता अन्य मोठा नेता किंवा प्रस्थापितांशी त्यांना जवळीक साधताच आली नाही. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे या काँग्रेसच्या मंत्र्यांशीही त्यांचे संबंध राजकीयदृष्टय़ा कायम दुरावलेलेच राहिले. या पार्श्वभूमीवर‘एकला चलो रे’असाच त्यांचा जिल्ह्य़ातील राजकीय प्रवास आहे. या‘एकला चलो रे प्रवासात अनेकदा त्यांची बेफिकिरी असे. अशा विविध कारणांनी ते श्रेष्ठींच्या मर्जीतून उतरत असतानाच साईकृपा या त्यांच्या खासगी साखर कारखान्याने याच हंगामातील गाळपाचे शेतक-यांचे सुमारे ४० कोटी रुपये थकवले असून त्याबद्दल साखरआयुक्तांनी कारखान्याच्या साखरजप्तीची नोटीसही या कारखान्यास बजावली आहे. हा प्रकार अगदीच ताजा असला तरी पक्षात नेमकी खांदेपालटाची प्रक्रिया सुरू होतानाच शेतक-यांचा असंतोष उफाळून आला. मागच्या आठ-दहा दिवसांतच त्याचा मोठा फटका पाचपुते यांना बसल्याचे समजते. स्वत: शरद पवार यांनीच ही बाब गांभीर्याने घेतल्याचे समजते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पाचपुते यांच्याकडे पुन्हा प्रदेशाध्यपदाची जबाबदारी येते, की त्यांना लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करावी लागते याकडे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे. पारंपरिक विधानसभा सोडून लोकसभेची निवडणूक लढवण्यास ते तयार नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच पक्षातील अन्य इच्छुकही कमालीचे सावध झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीबाबतही जिल्ह्य़ात नवीच गणिते मांडली जाऊ लागली आहेत. काँग्रेस आघाडीत शिर्डी काँग्रेसला व नगर राष्ट्रवादीला अशी वाटणी झाली असली तरी ती बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. विशेषत: काँग्रेसला नगर मतदारसंघ हवा आहे. त्यादृष्टीने विखे गटातून मोर्चेबांधणी सुरू आहे. ती अत्यंत प्राथमिक पातळीवर असली तरी तसे झाले तर फायदेशीर जावे म्हणून राष्ट्रवादीने उत्तरेतच पिचड यांना मंत्रिपद दिले असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते.
पाचपुतेंना आता प्रदेशाध्यक्षपद की, लोकसभा?
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांची मंत्रिपदावरूनच गच्छंती झाल्याने आता प्रदेशाध्यक्षपद की लोकसभा निवडणूक याविषयी जिल्ह्य़ात चर्चेला उधाण आले आहे.
First published on: 12-06-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is now pachpute state president or parliament