काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगासमोर गेलं आहे. या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी म्हटलं की लोक हसतात, वेड्यात काढतात, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पक्षफुटीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “भारतीय जनता पार्टीने देशाच्या राजकारणात ‘फोडा आणि राज्य करा’ ही नवीन नीति आणली आहे. घरं फोडायची, पक्ष फोडायचा. भाजपाने शिवसेना फोडली, काँग्रेस फोडली. समाजवादी पार्टी फोडण्याचा प्रयत्न झाला. आता आखिलेश यादव आणि शिवपाल यादव एकत्र आलेत. पण तुम्ही कितीही आमचे पक्ष फोडले, तरी मूळ विचार हा मूळ पक्षाकडेच असतो. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच आहे.”
“एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हटलं की लोक हसतात. अजित पवारांची राष्ट्रवादी म्हटलं की लोक हसतात. लोक त्यांना वेड्यात काढतात. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच काम करत आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत
अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या दाव्यावर संजय राऊत पुढे म्हणाले, “शरद पवार हे हयात आहेत. ते अस्तित्वात आहेत. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार समोर बसलेले आहेत. अशावेळी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार दावा सांगतात की, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा आहे. मग निवडणूक आयोगासमोर बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा आहेत का? निवडणूक आयोगालाही काहीतरी वाटलं पाहिजे, समोर पक्षाचे संस्थापक बसले आहेत आणि दुसरं कुणीतरी पक्षावर दावा सांगतोय. भाजपाने सुरू केलेले हे प्रकार देशाची लोकशाही आणि घटना पूर्णपणे खड्ड्यात घालणारे प्रकार आहेत.”