महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन, पक्षाची कार्यालये आणि पक्षाचा निधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपण शिवसेनेच्या कोणत्याही कार्यालयावर दावा सांगणार नाही. आम्हाला पक्षाच्या निधीची गरज नाही. तसेच ते पैसे कुठे आहेत, याचीही आम्हाला कल्पना नाही, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं. ते जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक, निकाल मान्य नाही म्हणत केली मोठी मागणी
शिंदे गटाकडून शिवसेना कार्यलयांवर दावा सांगितला जाणार का? असं विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, “शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्याचा आमचा काहीही उद्देश नाही. मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीतही दोन गट पडले होते. तेव्हा मुलायम सिंह यादव यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्याकडे संख्येच्या आधारावर पक्षाचं चिन्ह गेलं होतं. त्यामुळे यामध्ये कुणीही राजकारण करू नये, ही अपेक्षा आहे.”
हेही वाचा- “घातपात घडवण्याचं कारस्थान”, अज्ञात व्यक्ती पाळत ठेवत असल्याचं सांगत अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
“आम्ही कुठलंही कार्यालय ताब्यात घेणार नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. ही शिवसेना पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत,” असंही गुलाबराव पाटील म्हणाले. शिंदे गटाकडून पक्षाच्या निधीवर दावा केला जाणार का? असं विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, “तो दावा करण्याची आम्हाला गरज नाही. शेवटी पैसे कुठे आहेत? हेही आम्हाला माहीत नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली.