Maharashtra Government on Maratha Aarakshan Live Today : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेले कित्येक महिने आंदोलन चालू होतं. मनोज जरांगे पाटलांसह राज्यभरातील असंख्य मराठा बांधव एकवटले होते. मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी येथून उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या उपोषणाचं रुपांतर भव्य आंदोलनात झालं. अखेर आता सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षणासाठी पुकारलेलं आंदोलन संपलंय की तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय, याविषयी मनोज जरांगे पाटलांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे पाटील सध्या नवी मुंबईत आहेत. २० जानेवारी रोजी त्यांनी आंतरवाली सराटीतून पदयात्रा सुरू केली. २६ जानेवारी रोजी ते लोणावळ्याहून नवी मुंबईत दाखल झाले. २५ जानेवारीच्या मध्यरात्री लोण्यावळ्यात सरकाबरोबर त्यांची चर्चा झाली. या चर्चेतून सरकारने मागण्यांच्या पूर्ततेबाबत अध्यादेश काढला. परंतु, या अध्यादेशात मनोज जरांगे पाटलांनी काही सुधारणा सुचवल्या. या सुधारणांसहीत अध्यादेश आल्याशिवाय मुंबईतून हलणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मनोज जरांगेंचं वादळ मुंबईच्या वेशीवर पोहोचलं होतं. ते मुंबईत येण्याच्या निर्णयावर ठाम होते. तसंच, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यांतून मराठा बांधव मुंबईत दाखल होत होते. मुंबईत कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक कोडींची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, त्याआधीच सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. मध्यरात्री तीन तास चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. “हा मराठा समाजाचा विजय आहे. चहूबाजुने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येत होते, त्यांची मोठी ताकद होती. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या”, असं मनोज जरांगे म्हणाले. “असा अध्यादेश निघणं सोपं नव्हतं. मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, असं अनेकजण सांगत होते. परंतु, तरीही अध्यादेश निघाला. हा मराठा समाजाचा सर्वांत मोठा विजय आहे”, असंही मनोज जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन आता संपलंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी त्यांना असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, आम्ही आता आंदोलन स्थगित करतोय. सध्या राज्यभर दिवाळी सुरू आहे. यापेक्षा वेगळा आनंद काय असणार?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is the maratha movement over or just suspended manoj jarange patil said we now sgk