सांगली: राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिल्लीचे आदेश येतात. मात्र, राज्यातील गावांना पाणी देण्यासाठी दिल्लीच्या आदेशाची प्रतिक्षा सत्ताधारी करणार का असा खडा सवाल माजी राज्यमंत्री आ. डॉ. विश्वजित कदम यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.शासन आपल्या दारी हा इस्लामपूर येथील कार्यक्रम आटोपता घेत मुख्यमंत्री दिल्लीला गेले याबाबत विचारले असता गावांना पाणी देण्यासाठी दिल्लीला विचारणाार आहात का? असे जर असेल तर काँग्रेस लोकांना सोबत घेउन रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला.
सांगलीची जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसकडेच राहावी अशी आमची स्पष्ट भूमिका असून पक्षाच्या वरिष्ठांनी तसे महाविकास आघाडींना सांगितले आहे. अद्याप महायुतीचेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे सांगलीची जागा कोणाला याबाबत एवढी चर्चा करण्याची गरजच नाही. आघाडीत जागा वाटप करत असताना वर्तमान स्थिती, घटक पक्षांची ताकद या बाबींचा विचार केला जातो. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगलीची जागा अग्रहक्काने मागितली असून निश्चितपणे ही जागा काँग्रेसलाच मिळेल. या जागेसाठी विशाल पाटील यांच्या नावाची शिफारस एकमताने केली आहे.जर सांगलीची जागा अन्य मित्र पक्षाला गेली तर काँग्रेस कार्यकर्ते, नेते एकत्र बसून पुढील निर्णय घेतला जाईल. सांगलीच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह कसा होतो, कुणी या चर्चा घडवून आणत आहे का याबाबत त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.