सिरीयातील ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा संशय असलेला मुंब्रा येथील युवक तबरेज नूर मोहम्मद तांबे हा मूळचा हर्णे येथील रहिवासी असून या वृत्ताने दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तबरेजसंदर्भात माहिती घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी हर्णे आणि आडे येथील त्याच्या नातेवाईक आणि परिचितांशी संपर्क साधला. यावेळी सोशल नेटवर्कीग वेबसाईटच्या माध्यमातून संपर्कात असलेले त्याचे मित्र आणि परिचितांचे मोबाईल देखील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.तबरेजचे वडील हर्णे येथे रिक्षा व्यवसाय करत असत. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण दापोलीतच पूर्ण झाल्यामुळे त्याचा येथे मोठा मित्रपरिवार आहे. वडीलांचा अपघात झाल्यानंतर तांबे कुटुंबियांना खेडमध्ये स्थलांतर करावे लागले. कार्गो वाहतूक विषयातील पदविका मिळवल्यानंतर तबरेज नोकरीसाठी  प्रथम कुवेत आणि नंतर दुबई येथे गेला होता. दरम्यान, तांबे कुटुंबीयदेखील मुंब्रा येथे स्थायिक झाले. परदेशातून सुटीसाठी भारतात परतल्यानंतर तो हर्णे येथे आपल्या मित्रांना नेहमी भेटायला येत असे. मात्र २०१५ मध्ये तबरेज सौदी अरेबियात नोकरीसाठी गेला होता. तेथे त्याची अली नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. डिसेंबरमध्ये तेथील नोकरी सोडून परतल्यानंतर अलीदेखील त्याला भेटायला भारतात आला. त्यावेळी अली मुंब्रा येथे तबरेजच्याच घरी राहायला होता.  अली परदेशी गेल्यानंतर काही दिवसांतच तबरेजनेही लिबियात नोकरी लागल्याचे सांगून परदेशी प्रयाण केले. त्यानंतर तबरेजने आपण अली याच्या सहकार्याने सिरीयात इसिसमध्ये जात असल्याचे सांगितले. यादरम्यान, त्याचा कुटुंबीयांशी संपर्क होता. त्याचा भाऊ सौद याने त्याला असे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण तबरेजने त्याला नकार देत गेल्या आठ दिवसांपासून सिरीयात आश्रय घेतला आहे, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाकडून मिळाली आहे. दरम्यान, तबरेजच्या संपर्कात असलेले नातेवाईक आणि मित्रांकडून अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारीदापोलीत झाडाझडती घेतली. यामध्ये आडे येथे वास्तव्याला असलेल्या तबरेजची पत्नी आणि आईचीही भेट घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, सोशल नेटवर्कीग वेबसाईटवरून हर्णे येथील अनेक मित्र आणि परिचित तबरेजच्या संपर्कात होते. त्यांचे मोबाईलही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. यामध्ये सर्व जातीधर्मातील नागरिकांचा समावेश आहे. या घटनेने दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

Story img Loader