सांगली : गेली साडेतीन दशके इस्लामपूरमधील कटकारस्थानी नेतृत्वामुळे अनेकांच्या संस्था बुडाल्या. आता हे नेतृत्व भाजपशी जवळीक साधत असून, कोणत्याही स्थितीत अशा कटकारस्थानी नेतृत्वाला आमचा विरोधच राहील, स्वाभिमानी कार्यकर्ते यापुढे होणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवतील, असा विश्वास इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांनी मेळाव्यात व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक लक्षात घेऊन या मेळाव्याचे आयोजन प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते व इस्लामपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक एल. एन. शहा होते. स्वागत व प्रास्ताविक वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष प्रा. दत्तात्रय पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना भोसले- पाटील म्हणाले, भाजपचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्ष विस्ताराचे काम केले. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा आदेश महायुतीने दिला. या आदेशानुसार निवडणूक लढवली. निसटता पराभव मान्य करत, न खचता मतदार संघातील स्वाभिमानी मतदारांच्या हितासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तुमच्याबरोबर एक कुटुंब म्हणून मी तुमच्या बरोबर आहे.

गेली ३५ वर्षे या मतदार संघातील जनता दहशतीखाली आहे, कटकारस्थानी नेतृत्वामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेकांच्या संस्थांवर दरोडे पडले, सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेला अपमानाची वागणूक मिळाली, सत्तेचा वापर करत पोलीस, प्रशासनातील अधिकारी यांच्यावर दबाव टाकत विरोधकांना लक्ष केले. सत्तेला चिटकून राहाण्यासाठी भाजपा नेत्यांच्या मागेपुढे करणारे स्वार्थी, कटकारस्थानी नेतृत्वाला आमचा कायम विरोध असेल, यासाठी भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून आपण राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा घेण्याचा निर्णय उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकू व राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) यांची विक्रमी सभासद नोंदणी करू, असा निर्धार करून विश्वास दिला. आभार रणजीत माने यांनी मानले.