धाराशिव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयासाठी कौशल्य व उद्योजकता विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील जागा या दोन्ही विभागाने महसूल विभागास हस्तांतरीत करावी तसेच महसूल विभागाने दोन्ही विभागांची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारणीसाठी हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने शुक्रवारी निर्ममित केला आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न अखेर सुटला आहे.
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती. महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २७ जानेवारी २०२१ रोजी मंजूर झाले. सध्या जिल्हा रूग्णालयाच्या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र जागेचा शोध मागील काही दिवसांपासून सुरू होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील जागा जूनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने पाहणी केली होती. कौशल्य व उद्योजकता विभाग ९.३४ हेक्टर आणि जलसंपदा विभागाची ३ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली होती.
आणखी वाचा-थंडीची चाहूल लागताच राज्यात विजेची मागणी घसरली; कोराडी प्रकल्पात सर्वाधिक वीज निर्मिती
धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयास शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन महाविद्यालय व त्या संलग्नित ४३० खाटांचे रूग्णालयास मान्यता देण्यात आली आहे. हे महाविद्यालय व रूग्णालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घालून दिलेल्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता एकाच ठिकाणी २० एकर जमीन असणे आवश्यक आहे. त्याकरिता शहरातील जलसंपदा विभागाची तीन हेक्टर आणि कौशल्य व उद्योजकता विभागाच्या ताब्यातील ९.३४ हेकटर जागा उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने १६ सप्टेंबर रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण विभागाने जागेसंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.