वाई: विकसित भारत संकल्प यात्रेस विरोध करा किंवा समर्थन करा काही फरक पडत नाही असे आश्चर्यजनक विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी साताऱ्यात केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी हे साताऱ्यात आहेत. सायंकाळी पत्रकारांशी बोलताना अनेक ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध होत आहे याविषयी निदर्शनास आणले असता त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुनील काटकर, अविनाश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
मोदी सरकारने नऊ वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सध्या अनेक भागात सुरू आहे. ही यात्रा गावागावात जात आहे. मात्र काही गावात या यात्रेला विरोध होत आहे. ही बाब निदर्शनास आणली असता, अजयकुमार मिश्रा यांनी विकसित भारत संकल्प यात्रेस कोणाचा विरोध अथवा समर्थन असून काही फरक पडत नाही असे आश्चर्यजनक विधान केले. जे लोक विरोध करत आहेत त्यांच्याशी चर्चेची गरज नाही किंवा त्यांचे मत विचारात घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक गावात ही विकसित भारत संकल्प यात्रा गेली असता ग्रामस्थांच्या किंवा गावकऱ्यांच्या विरोधामुळे अधिकारी काढता पाय घेत आहेत असेही त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. मात्र याबाबत त्यांनी या विषयी योग्य भूमिका न मांडता याविषयी उलट मत व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आणखी वाचा-पठ्ठ्याने शिकारीसाठी बंदूक बनवण्याचा उद्योग सुरू केला अन्…
विकसित भारत संकल्प यात्रेची लोकांपर्यंत पोहोचवण्याची तीन वैशिष्ट्ये आहेत आणि ती यात्रा लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही गोष्टीला कोणीतरी विरोध करणार आणि कोणीतरी समर्थन करणार विरोध करणाऱ्या बद्दल जास्त विचार करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
राम मंदिर हा भाजपाचा राजकीय विषय नाही
राम मंदिर हा भाजपाचा राजकीय विषय नाही. मंदिराचे निर्माण ट्रस्ट करत आहे. रामलल्ला च्या मूर्ती स्थापनही तेच करणार आहेत. सर्व भारतातल्या लोकांना तेच निमंत्रित करत आहेत. त्यामुळे राम मंदिर निर्माण हा राजकारणाचा विषय नाही. पाचशे वर्षांपूर्वी पासून हिंदूस्थानातील लोकांना कमजोर करण्याचे काम काही प्रवृत्ती करत होत्या. मात्र आपली संस्कृती सभ्यता संस्कार आणि ज्ञान यांच्या बळावर आपण हे आक्रमण परतवून लावले आहे. या आक्रमणाचा राम मंदिर निर्माण हा विजय आहे. जे मागील पाचशे वर्षात राम मंदिराच्या प्रश्नांवर विरोध करत होते असे हताश लोक आणि विरोधक राम मंदिराची निर्मिती पचवू शकत नाहीत. या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि राम मंदिर निर्माण मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग आहे. अयोध्येत जाऊन प्रत्येकाने रामलल्ला चे दर्शन घ्यायला हवे. परंतु दि २२ जानेवारी रोजी या ठिकाणी खूप मोठी गर्दी असल्याने सर्वांना दर्शन याच दिवशी उपलब्ध होईल असे नाही. त्यामुळे जेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यावेळी जाऊन दर्शन घ्यावे असेही त्यांनी सांगितले.