सांगली : यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन एक रकमी ३ हजार १७५ रुपये देण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीत मान्य करण्यात आले. ही बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती दोडभिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
बैठकीस पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपजिल्हाधिकारी तृप्ती पाटील, आमदार अरुण लाड, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, राजाराम बापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, कार्यकारी संचालक आर.डी. माऊली, शरद कदम, आर डी पाटील, संतोष कुंभार, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांदरे अजित हलिगळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा – वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया’त घेणार? मल्लिकार्जुन खरगेंचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले…
आमदार लाड यांनी तोडणी वाहतूक वाढणार आहे, इथेनॉलवर बंदी घातली आहे, त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत, त्यामुळे मागणीप्रमाणे ३ हजार २५० रुपये दर देणे अशक्य असल्याचे सांगत एकरकमी ३ हजार १७५ रुपये प्रतीटन देण्याची तयारी दर्शवली. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंनी न ताणता यावर सहमती दर्शवावी असे आवाहन केले. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून हा दर मान्य करण्यात आला. ऊस दराची अर्धी लढाई जिंकली असली तरी काटामारी, तोडणीसाठी घेतली जाणारी बिदागी यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील, असे खराडे यांनी सांगितले.