कराड : कराड तालुक्यातील वहागांव येथे लोकसहभागातून साकारलेली वृक्ष लागवड, संगोपन अन् संवर्धन चळवळ आदर्शवत असून, वहागांव ग्रामपंचायतीचा हा आदर्श सर्वच ग्रामपंचायतींनी घ्यावा असे आवाहन करताना जल, जंगल, जमीन वाचवण्याचे कर्तव्य सर्वांचेच असल्याने आम्ही ते पार पाडत असल्याचे नाम फाउंडेशनचे प्रमुख व सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.

पुणे- बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात कत्तल होणारी काही जुनाट व महाकाय वृक्ष मुळातून व्यवस्थित काढून त्यांना वहागाव (ता. कराड) येथे सह्याद्री देवराई व नाम फाउंडेशनच्या पुढाकाराने पुनर्रोपणातून जीवदान देण्यात आले. अशा वृक्षांच्या सदिच्छा भेटीवेळी मकरंद अनासपुरे बोलत होते. ‘नाम’चे संकल्पक, प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे, वहागावचे सरपंच धनंजय पवार, सुरेश पवार यांच्यासह ग्रामस्थांची या वेळी उपस्थिती होती.

मकरंद अनासपुरे म्हणाले की, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळी प्रदेशात पाणी आडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार यावर आम्ही प्रचंड काम करतोय. माझ्यासह सयाजी शिंदे यांनीही ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून देशी वृक्ष लागवडची चळवळ सर्वदूर जोमाने उभी करून गावोगावी हजारो देशी झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनला चांगली मदत होत आहे. आज वहागावमध्ये सयाजी शिंदेंच्या मार्गदर्शनखाली उभा राहिलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे कौतुक मकरंद अनासपुरे यांनी केले.

महामार्गाचा रुंदीकरण कामात जाणारी जुने सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची वड, पिंपळ ही झाडे इथल्या ग्रामस्थांनी पुनर्रोपण केली असून, मोकळी जागा दिसेल तिथे देशी वृक्ष लावली आहेत. हे काम प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर, झाले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने हे काम सतत केले पाहिजे. जल, जमीन, आणि जंगल सर्वांनी मिळून वाचवावे. येणाऱ्या काळात मी आणि सयाजी वहागावसाठी अजून वेगळे उपक्रम राबवू अशी ग्वाही मकरंद अनासपुरे यांनी दिली. दरम्यान. वहागाव येथे पुनर्रोपणातून जीवदान मिळालेल्या सुमारे दोनशे वर्षे जुन्या वडाच्या वृक्षाला आलिंगन देत मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांनी आनंद व्यक्त केला.