देशभर असहिष्णुतेच्या नावाखाली पुरस्कार परत केले जात आहेत, मात्र असहिष्णुतेसंबंधीचे निष्कर्ष अतिशय घाईने काढले जात असून, आधी त्याची खातरजमा करून मगच निर्णय घ्यायला हवा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
जागृती शुगर येथे विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाच्या अनावरण समारंभानंतर हजारे पत्रकारांशी बोलत होते. वन रँक वन पेन्शनबाबत झालेल्या आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने सनिकांसाठी ठोस निर्णय घेतले. याविषयी सर्व स्तरांत समाधान व्यक्त होत असून मीही समाधानी आहे. भूमी अधिग्रहण विधेयकात केंद्राने अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असून, सरकारने शेतकरीहिताचे घेतलेले निर्णय निश्चित स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले.