३१ जुलैच्या दिवशी जयपूर-मुंबई एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत चेतन सिंहने टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. त्या डब्यात आणखी एका प्रवाशाची हत्या केल्यानंतर त्याने पॅन्ट्री डब्यात एकाला गोळी मारली. त्यानंतर पुढील डब्यामध्ये आरोपीने आणखी एकाची हत्या केली. त्यानंतर मिरा रोड स्थानकावर उतरल्यानंतर आरोपी स्थानकावर उतरून रूळांवरून पळू लागला. पण त्याला पोलिसांनी पकडलं. आता या घटनेतील प्रत्यक्षदर्शी प्रवाशाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलंय प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने?
“मी चेतनला गोळीबार करताना पाहिलं तेव्हा मला २६/११ चा हल्ला करणाऱ्या आणि अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या कसाबची आठवण आली. तसंच मुंबईवर झालेला तो भयंकर २६/११ चा हल्लाही आठवला असं कृष्ण कुमार शुक्ला यांनी म्हटलं आहे. ” शुक्ला हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते. मागच्या १२ वर्षांपासून ते अटेंडट म्हणून काम करतात.
चेतनच्या हातात बंदुक होती. तो गोळीबार करत होता. त्यावेळी मला दहशतवादी कसाबलाच पुन्हा पाहतोय की काय असं वाटलं. मी तो प्रसंग कधीही विसरु शकत नाही. मी B5 या डब्यातच होतो. मी गोळीचा आवाज ऐकला सुरुवातीला मला वाटलं काहीतरी स्पार्किंग झालं आहे का. पण नंतर मी ASI टीकाराम यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. त्यानंतर माझं लक्ष तिथे उभं राहिलेल्या चेतनकडे गेलं. मी आणि माझ्यासह त्या डब्यात असलेले सगळेच एका दहशती खालीच होते असंही शुक्ला यांनी सांगितलं. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
काय घडली घटना?
३१ जुलैच्या दिवशी जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) जवानाने गोळीबार केला. त्यात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. वापी स्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर पहाटे या जवानाने तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि आरोपीने मिरा रोड स्थानकावर गाडी थांबल्यावर उडी मारली. तेथील रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला?
या हल्ल्यात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना, अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन भानपूरवाला, अख्तर अब्बास अली यांच्यासह एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत चेतन सिंहने टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. त्या डब्यात आणखी एका प्रवाशाची हत्या केल्यानंतर त्याने पॅन्ट्री डब्यात एकाचा गोळी मारली. त्यानंतर पुढील डब्यामध्ये आरोपीने एकाची हत्या केली. त्यानंतर मिरा रोड स्थानकावर उतरल्यानंतर आरोपी स्थानकावर उतरून रूळांवरून पळू लागला. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले.