शहरातील जमीन खरेदीत आपली फसवणूक होण्याच्या प्रकरणात शासकीय यंत्रणेचे अधिकारीही सामील आहेत, असा आरोप करीत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी यापेक्षा परदेशात जाऊन राहणे चांगले, अशी भावना नाशिकमध्ये व्यक्त केली. आपल्यासारख्या व्यक्तीला अशा प्रकारे लुटण्याचा प्रकार होत असेल तर, सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 
नाशिकमधील प्रसिद्ध गायिका मधुरा बेळे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘पंढरीच्या वाटेवरी’ या ध्वनिमुद्रिकेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वाडकर बोलत होते. नाशिकरोड येथे सुरेश वाडकर यांनी काही वर्षांपूर्वी जमीन खरेदी केली होती. या व्यवहाराची कागदपत्रे तपासल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी महसूल विभागाकडे याचिकाही दाखल केली. यासंदर्भात बोलताना वाडकर यांनी या संपूर्ण फसवणूक प्रकरणात शासकीय अधिकारीही सामील असल्याचा आरोप केला. आपण संगीत शाळा सुरू करण्यासाठी विदेशातही जमीन खरेदीचा व्यवहार केला आहे, परंतु असा अनुभव कुठेच आलेला नाही. आपण सामान्य कुटुंबातून असून कष्टाने इथपर्यंत आलो आहोत. कष्टाने जमविलेल्या पैशातून मालमत्ता खरेदी केली, परंतु त्यातही फसवणुकीचा प्रकार घडला. आपल्या बाबतीत असे होऊ शकते तर, सर्वसामान्यांच्या बाबतीत काय होत असेल, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It will better to leave this country and stay in foreign country says suresh wadkar