सिंचन घोटाळयाची एसआयटी चौकशी करण्याच्या मागणीवरून विधानसभेत आज (गुरूवार) गदारोळ झाल्यामुळे तीन वेळा सभागृहाचे कामकाज ठप्प करावे लागले. कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यानी सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची तयारी असल्याचे सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दाखवली. त्यावरून आरोपांच्या फैरी झाडत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. परंतू, कामकाज सुरू झाल्यानंतरही या वादावर तोडगा निघू न शकल्याने दोनदा कामकाज तहकूब करावे लागले. शेवटी वादावर तोडगा निघत नसल्याचे पाहून दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागल्याने दोनच तासात विधानसभेचे कामकाज संपले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर होणा-या आरोपांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ‘सत्यमेव जयते’ आणि ‘सिंचनाचा घाव आणि कुटील राजकीय डाव’ अशा दोन पुस्तिका प्रसिध्द केल्या असून अजित पवारांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे जाहीर करत त्याबाबत जनसामांन्यामध्ये जागृती करणार असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
नागपूरात सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रिका समारंभाच्या कार्यक्रमांना उधाण आल्याचे चित्र पहायला मिळाले. राष्ट्रवादीकडून आज ‘सत्यपत्रिका’ प्रकाशित करण्याच्या आधीच भाजपने ‘सत्यावर घाव’ पत्रिका फोडून बाजी मारण्याचा प्रयत्न केला.
सिंचनाबाबत विरोधी पक्ष अपप्रचार करत असून सत्य बाजू जनतेसमोर यावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून ‘सत्यपत्रिका’ प्रकाशित करत आहोत, असं नवाब मलिक यावेळी म्हणाले. यावेळी गृहमंत्री आर आर पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, पक्ष प्रवक्ते नवाब मलिक आदी जेष्ठ नेते उपस्थित होते.
विरोधकांना महाराष्‍ट्राची अर्धवट माहिती आहे, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी यावेळी केली. आधी पूर्ण माहिती घ्या आणि मगच आरोप करा, असाही सल्ला पाटील यांनी दिला. राज्याच्या सिंचन क्षेत्रात ५.१७ टक्के वाढ झाल्याचा दावाही यावेळी पाटील यांच्यातर्फे करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी चालविले असून त्यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणीही आर.आर.पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या आधीच भारतीय जनता पक्षाने ‘सत्यावर घाव पत्रिका’ फोडून खळबळ माजविली. सत्यपत्रिकेमध्ये ‘अर्धसत्य’ असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनी केला आहे. तर, ही ‘सत्य’ पत्रिका नसून ‘असत्य पत्रिका’ असल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा