कविता लिहिण्याचा प्रत्येकाला अधिकार असला तरी कवी होणे म्हणजे मोठी जोखीम आहे, असा इशारा ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी शुक्रवारी दिला.
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे  मालगुंड येथे तीन दिवसांचा राष्ट्रीय काव्योत्सव आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी या महोत्सवाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना काळसेकर म्हणाले की, सर्वसामान्य माणासापेक्षा कवीची मानसिकता वेगळी असते. तो सतत स्वत:कडूनच छळला जात असतो. कारण तो कमालीचा अस्वस्थ असतो. कविता लिहिण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीचेही भान असले पाहिजे. स्वत:च्या म्हणण्याशी आपण किती प्रामाणिक आहोत, याची उलटतपासणी कवीने हरेक क्षणाला घेतली पाहिजे.
माझ्या बालपणातील शिक्षकांमुळे आज मी या पदापर्यंत पोहोचलो, अशी कबुली देऊन उद्घाटक प्रा. शिंदे म्हणाले की, शिक्षक आणि आई ही कोणाच्याही बालपणाच्या काळातील दोन महत्त्वाची माणसे असतात. आई घरातील शिक्षक असते, तर शिक्षक बाहेरच्या जगातील आई असते. म्हणूनच माणसाच्या जडणघडणीत या दोघांचे महत्त्वाचे स्थान असते.  मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन सर्व मान्यवर साहित्यिकांनी त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
कोमसापच्या कार्यकारी अध्यक्ष नमिता कीर यांनी प्रास्ताविक केले, तर केंद्रीय अध्यक्ष महेश केळुसकर यांनी या महोत्सवामागील भूमिका विशद केली. राज्यमंत्री सामंत आणि अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना कार्यक्रमामध्ये ‘साहित्यमित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मालगुंड गावात काव्यज्योत आणि साहित्य दिंडी काढण्यात आली. काव्योत्सवाच्या व्यासपीठाला कवी मनोहर तोडणकर यांचे नावे देण्यात आले असून त्या ठिकाणी दुपारच्या सत्रात भाषा भगिनी कविता मैफल रंगणार आहे. सर्वश्री प्रज्ञा दभ्रे (संस्कृत), पांडुरंग फळदेसाई (कोंकणी), इरफान जाफरी (उर्दू), लक्ष्मण दुबे (सिंधी), अनिलकुमार जोशी (गुजरात) आणि सुनील देवधर (हिंदी) इत्यादी मान्यवरांनी त्यामध्ये भाग घेतला. तसेच ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी निमंत्रित कवींचे संमेलन झाले. शनिवारी, संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. प्रा. सोमनाथ कोमरपंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय कवितेतील भूमिनिष्ठ जीवन संस्कृती’ या विषयावर, तर सतीश काळसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय कवितेतील महानगरीय जीवन संस्कृती’ या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आले आहेत.  तसेच संध्याकाळी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्य रत्नावली’ हा निमंत्रितांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध कवी सौमित्र यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (२० ऑक्टोबर) सकाळी साडेअकरा वाजता या काव्योत्सवाची सांगता होणार आहे.

Story img Loader