पुलवामा हल्ल्यानंतर देशभर श्रद्धांजली वाहिली गेली. सर्वांनी मुठी आवळल्या. तेंव्हा मनापासून असं वाटलं की पिंपरी चिंचवड लगतच्या पुण्यातील लाल महालात लपलेल्या शाहिस्तेखानाच्या भर फौजेत घुसून त्यांना अद्दल घडवणारे महाराज, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची वेळ आली आहे, यासंदर्भात तशी कारवाई केली जाईल अशी अपेक्षा एक शिवभक्त म्हणून करतो, असे स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेते डॉ. अमोल कोल्हे म्हणाले आहेत. ते पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त समाज प्रबोधनात ते बोलत होते यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला. ते म्हणाले की,सत्ता असताना सत्तांध न होणं, हा महाराजांनी सर्वात पहिला आदर्श घालून दिला.आजच्या काळात हे अनेकांना लागू पडत असेल. सत्ता हातात असताना माणसानं कधी सत्तांध व्हायचं नसतं,रयतेच्या कल्याणाच राज्य राबवायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त समाज प्रबोधन पर्वात ते बोलत होते. तेंव्हाच महाराजांच्या आदर्शाची आठवण करून देत, रयतेच्या कल्याणाच राज्य राबवण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आणि सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला.