रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार नीलेश राणे यांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना कधीच निमंत्रण देण्यात आले नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
    खासदार नीलेश यांच्याविरोधी प्रचार केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, तर रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे यांच्याऐवजी शेकापचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रचारात सहभागी झाल्याबद्दल चिपळुणच्या नगराध्यक्ष रिहाना बिजले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर खासदार नीलेश यांच्या प्रचारापासून प्रदेशाध्यक्ष जाधव दूर राहिल्याबद्दल कारवाई करणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. त्यावर खुलासा करताना जाधव यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले की, प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे किंवा खासदार नीलेश यांच्याकडून त्यांना औपचारिक किंवा अनौपचारिकपणेही निमंत्रण देण्यात आले नाही. मतदानापूर्वी काही दिवस आधी उद्योगमंत्री राणे यांची चिपळुणात प्रचार सभा झाली. या वेळी प्रदेशाध्यक्ष जाधव चिपळूणमध्येच होते,
पण तेव्हाही त्यांना सभेसाठी बोलावण्यात आले नाही. काँग्रेस आघाडीच्या प्रचारात सुसूत्रता राखण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रचारासाठी अपेक्षित नेत्यांना लेखी विनंतीपत्र देण्याची पद्धत ठरवण्यात आली आहे. तसे एकही पत्र जाधव यांना काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पाठविण्यात आले नाही. त्यामुळे ते प्रचारात सहभागी झाले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.