लातूर -मजुरांच्या तुटवड्यामुळे गुळाच्या उत्पादनात वेगाने घट होत असून गुळ पावडर करण्याकडे आता लोकांचा कल वाढला आहे. राज्यात जेवढे साखर कारखाने आहेत साधारण तेवढ्याच संख्ये इतके गुळ पावडर उत्पादक आहेत. गुळ पावडर उत्पादन करणे याला यंत्र साह्य घेता येते मात्र गुळाचे उत्पादन करायचे ठरवले तर त्यासाठी मजुरावरच अधिक प्रमाणात अवलंबून राहावे लागते.

ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांमुळे मजुरांच्या हातात पैसा खुळखुळत असल्यामुळे आता काम करायला लोक फारसे तयार नाहीत त्यामुळे गुऱ्हाळाच्या संख्येमध्ये प्रचंड घट झाली आहे. यावर्षी लातूर बाजारपेठेमध्ये गुळाची आवक चार ते पाच हजार ढेप इतकी दररोज होते व गुळाला कमी भाव ३६०० रुपये क्विंटल तर अधिकचा भाव ४१०० रुपये क्विंटल इतका आहे. गतवर्षी हाच भाव ३००० रुपये कमीत कमी तर ३५०० रुपये  हा अधिकचा भाव होता. गेल्या चार-पाच वर्षात गुऱ्हाळांची संख्या वेगाने कमी होते आहे.

चार वर्षांपूर्वी याच कालावधीमध्ये गुळाची आवक लातूर बाजारपेठेत २५ ते ३० हजार ढेपी असायची मात्र आता गुळाचे उत्पादनच कमी झाल्यामुळे आवकही मंदावली आहे. गुळ पावडर तयार करण्याचे कारखाने अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत .लातूर जिल्ह्यात सुमारे १२ कारखाने असून प्रत्येक कारखान्याची क्षमताही दर दिवशी १०० ते २०० टन इतकी आहे.

साखर कारखान्यांप्रमाणेच गुळ पावडर उत्पादकही ऊसाला भाव देतात व शेतकऱ्याचा ऊस खरेदी करताना साखर कारखान्यांप्रमाणे फारसे निकष न लावता येईल तसा ऊस खरेदी केला जातो . जे ऊस उत्पादक सभासद नाहीत अशी मंडळी गुळ पावडर उत्पादकांना आपला ऊस घालण्याकडे कल वाढला आहे. लातूर बाजारपेठेतून गुळ पावडर दक्षिण भारत व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर विकली जाते.

महाराष्ट्रात सगळीकडे आता गुळांच्या चहाची फॅशन आली आहे. या गुळाच्या चहाला गुळ पावडरच वापरली जाते व त्याला चांगला भाव मिळतो. एक किलो पॅकिंग मध्ये गुळ पावडर मोठ्या प्रमाणावर विकली जाते तर तीस किलोचे पॅकिंगही बाजारात उपलब्ध आहे. गुळाची आवक राज्यातील सर्वच बाजारपेठेमध्ये मंदावलेली आहे. चांगल्या प्रतीची गुळ पावडर चहासाठी  विकली जाते तर कमी दर्जाची गुळ पावडर ही दारु तयार करण्यासाठी विकली जाते .

बाजारपेठेतील आवक मंदावली

बाजारपेठेतला कल बदलतो आहे एकेकाळी राज्यात लातूर, कोल्हापूर, सांगली, जळगाव या बाजारपेठेमध्ये गुळाची मोठ्या प्रमाणावर आवक होती मात्र गेल्या दोन-चार वर्षांमध्ये गुळ पावडर उत्पादनाकडे लोकांचा कल वाढला असल्यामुळे बाजारपेठेतील आवक मंदावली आहे. चांगला भाव मिळत असला तरी उत्पादनच मंदावल्यामुळे आवक मंदावली असल्याचे लातूर येथील गुळाचे ठोक व्यापारी ललितभाई शहा यांनी सांगितले.