लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : करमाळा तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आणि कोट्यवधी रुपयांच्या कर्जामुळे बंद असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या बागल गटासह माजी आमदार जयवंत जगताप यांच्या गटानेही माघार घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या गटातच होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस असून त्यात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
एकूण २१ जागांसाठी २७२ दाखल झाल्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत असतानाच बागल आणि जगताप या दोन्ही गटांनी माघार घेतली आहे. मात्र या दोन्ही गटांची कोणाला साथ मिळणार, याची उत्सुकता कायम आहे.
आदिनाथ साखर कारखान्याची उभारणीपासून ते साखर उत्पादनापर्यंत वाटचाल रडत रखडतच होत आहे. मागील पाच वर्षांत तीन वर्षे कारखाना बंद आहे. त्याअगोदरही हा कारखाना कधीही क्षमतेने चालू शकला नाही. आतापर्यंत अनेक वर्षे या कारखान्यावर दिवंगत माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या गटाची सत्ता होती. परंतु आर्थिक अडचणीतून कारखान्याला बाहेर पडता आले नाही. भविष्यातही हेच आव्हान आहे.
या पार्श्वभूमीवर या कारखान्याच्या होत असलेल्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी अंग काढून घेतले आहे. त्यापाठोपाठ त्यांचे विरोधक माजी आमदार जयवंत जगताप यांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण केलेले प्रयत्न अपुरे ठरल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. जगताप गट सध्या ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या सोबत एकत्र काम करीत आहे. या सर्व नेत्यांशी चर्चा करूनच आपण माघारीची भूमिका घेतल्याचे जगताप यांनी सांगितले.
बागल गटाने या निवडणुकीत माघार घेतल्याची घोषणा करताना कारखान्याच्या आर्थिक अडचणी पुढे केल्या. आर्थिक अडचणींमुळे भविष्यातही कारखाना चालविणे कठीण असल्याचे बागल गटाचे मार्गदर्शक विलास घुमरे यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास येत्या १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.