कराड : कराड तालुक्यातील भोसलेवाडीत श्री गोपालनाथ महाराजांच्या तीन दिवस चालणाऱ्या आणि अनोख्या पध्दतीने साजऱ्या होणाऱ्या एकनाथ षष्ठी उत्सवात नागोबा बनण्याचा मान जयदीप लक्ष्मण तोडकर (रा. कासेगांव) या जावयास मिळाला.एकनाथ षष्ठी उत्सवात दहीहंडी फोडण्याची आणि दहीहंडी फोडण्यापुर्वी धार्मिक पध्दतीने विविध खेळ खेळण्याची परंपरा आहे. त्यातील खेळाचा एक प्रकार म्हणून जावयाला नागोबा बनवले जाते. दरवर्षी उत्सवात एका जावयाला हा मान मिळतो.

यंदा हा मान जयदीप तोडकर यांना मिळाला. या वेळी परंपरेने सवाद्य गीतात व देवाच्या जयघोष होत असताना जयदीप तोडकर यांनी हाताने डोक्यावर नागाची फड बनवून परंपरागत झाडाखाली नृत्य केले. या वेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला. जावयाचा नागोबा हा आश्चर्यकारक खेळ अनुभवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.भोसलेवाडीत २८१ व्या श्री एकनाथ षष्ठी उत्सवाची शनिवारी उत्साहात सांगता झाली. परंपरेनुसार तीन दिवस श्री गोपालनाथ मंदिरात भरगच्च धार्मिक कार्यक्रम पार पडले. मधुकर महाराज दिक्षीत यांचे काल्याचे किर्तन. त्यानंतर गुलाल समर्पण अन् फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

हजारो भाविकांनी यासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. अनेक मठांचे मठाधिपती तसेच सर्व मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीनाथ भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. आरतीनंतर गोपालनाथ महाराज मंदिरात पुष्प वृष्टी करून उत्सवाचा समारोप झाला. षष्ठीच्या दुसऱ्या दिवशी वांगे भाकरी या अनोख्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासही हजारोंच्या संख्येने भाविक आले होते. आमदार मनोज घोरपडे यांनीही श्री गोपालनाथ महाराजांचे दर्शन आणि महाप्रसादाचाही लाभ घेतला. भोसलेवाडी व देवस्थानच्या विकासासाठी लागेल तितका निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली.