तब्बल अडीच वर्ष ग्रीसमधील तुरुंगात असलेला कल्पेश शिंदे हा ठाण्यातील तरुण अखेर मायदेशी परतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यानंतर कल्पेशची सुटका झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे येथील वृंदावन परिसरात राहणाऱ्या कल्पेश शिंदेने शिंपिंगमध्ये शिक्षण घेतले असून नवी मुंबईतील एका खासगी संस्थेमार्फत त्याने ग्रीसमध्ये नोकरी मिळवली होती. त्याला ४०० डॉलर इतका पगारही होता. जून २०१५ मध्ये कल्पेश ग्रीसला गेला होता. दोन महिन्यांनी म्हणजेच ऑगस्टमध्ये कल्पेशच्या जहाजातील कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला होता. आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी ही शस्त्रे पुरवली जात असल्याचा आरोप होता. जवळपास अडीच वर्ष तो ग्रीसमधील तुरुंगात होता. याप्रकरणात जहाजाच्या कॅप्टनसह सात जणांना अटक झाली होती. अखेर परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कल्पेशची सुटका करण्यात आली.
कल्पेश दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील घरी परतला आहे. ग्रीसमधील अनुभवाविषयी कल्पेश सांगतो, मी हुदाद या जहाजावर होतो. आम्ही लिबीयाच्या दिशेने जात होतो. जहाजातील कंटेनरमधील सामानाची तुर्कस्तानातील यंत्रणांनी तपासणी देखील केली होती. कंटेनरमध्ये प्लास्टिक फर्निचर असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, ग्रीसमध्ये ज्यावेळी आमचा जहाजात शस्त्रसाठा होता हे समजले तेव्हा आम्हाला सातही जणांना धक्काच बसला, असे कल्पेशने सांगितले. माझ्यासह आणखी एक भारतीय देखील जहाजावर होता. आमचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे ग्रीसमधील अधिकाऱ्यांना देखील माहित होते, असे त्याने सांगितले. आता कल्पेशला ग्रीसमधील न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

कल्पेशचे वडील राजेश आणि आई पल्लवी हे दोघेही आता आनंदात आहे. मात्र मुलाने पुन्हा जहाजावर नोकरी करु नये असे त्यांना वाटते. कल्पेशला कॅप्टन व्हायची इच्छा होती. पण त्याने हे क्षेत्र निवडावे असे आम्हाला वाटत नव्हते. त्याने आता भारतात राहुनच नोकरी करावी, असे त्यांनी सांगितले. तर कल्पेश मात्र पुन्हा जहाजावर जाण्यासाठी तयार आहे. ‘प्रत्येक नोकरीत चांगला व वाईट अनुभव येतच असतो. माझ्यासाठी हा कटू अनुभव होता. पण मला पुन्हा समुद्रात जायला नक्की आवडेल, असे त्याने सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jailed in greece thane sailor kalpesh shinde returns home after two and half years