सल्लेखना व्रत घेणाऱ्या साधूंवर राजस्थान उच्च न्यायालयाच्या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी धर्म बचाओ आंदोलन फेरी व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ग्रामीण भागातील जैन धर्मीयांनी व्यवहार बंद ठेवले होते. शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन धार्मिक हस्तक्षेप करू नये या मागणीचे निवेदन देण्यात आले.
राजस्थान उच्च न्यायालयाने सल्लेखना व्रत (संथारा) घेणाऱ्या साधूंवर कारवाईची भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत. हे व्रत म्हणजे आत्महत्या असून ते बेकायदा असल्याने अनुमोदन देणाऱ्या साधू वा व्यक्तींवर कारवाई करता येते, असे न्यायालयीन निकालात म्हटले आहे. यामुळे जैन धर्मीयातून संताप व्यक्त केला जात आहे. निर्णयाविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून न्यायालयीन तसेच रस्त्यावरील संघर्ष सुरू झाला आहे. याअंतर्गत सोमवारी इचलकंरजी, जयसिंगपूर, हातकणंगले यासह ग्रामीण भागात मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
जयसिंगपूर येथे मुनिश्री अक्षयसागर महाराज व नेमीसागर महाराज यांच्या उपस्थितीत मूक मोर्चा काढण्यात आला. इचलकरंजी येथे महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या मूक मोर्चात हजाराहून अधिक जैन बांधव सहभागी झाले होते. माजी खासदार कल्लाप्पाण्ण आवाडे, नगरसेवक महावीर जैन, रमेश जैन आदी सहभागी झाले होते. प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन देण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील जैन समाजातर्फे तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सहभागी होण्यासाठी जैन धर्मीयांनी सर्व व्यवहार बंद ठेवले होते. हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांमध्ये जैन समाजाची संख्या लक्षणीय असून अनेक गावांतील व्यवहार बंद ठेवण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा