सांगली : विलेपार्ले भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ गुरुवारी दक्षिण भारत जैन सभेच्या नेतृत्वाखाली सकल जैन समाजाच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण जैन आणि अहिंसाप्रेमी समाज, प्रत्येक गावातील जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त, जैन समाजाची मंडळे, संस्था सहभागी झाल्या होत्या.
विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिनसेन महाराज, खा. विशाल पाटील, आ. डॉ. राजेंद्र पाटील, आ. सदाभाऊ खोत, पृथ्वीराज पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, डॉ. अजित पाटील, संजय शेटे, अरविंद मजलेकर, सिध्दार्थ गाडगीळ यांच्यासह सुमारे दहा हजाराचा जनसमुदाय मोर्चात सहभागी झाला होता.
पाडकाम केलेल्या जागीच मंदिर पुन्हा उभे करावे अशी आग्रही मागणी मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. महापालिका प्रशासनाचा निषेध करत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली.या मोर्चात दिगंबर, श्वेतांबर व जैन समाजाच्या सर्व पंथीय समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता. आक्रोश मोर्चाचे कलेक्टर ऑफिससमोर सभेत रूपांतर झाले. सुरुवातीला पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.