जळगाव आणि पाचोऱ्यातील शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत ( ठाकरे गट ) प्रवेश केला आहे. ‘मातोश्री’वर शिवसेना ( ठाकरे दट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. “सत्तेची भीती वाटत असेल, तर ती उलथवलीच पाहिजे. ती उलथवण्यासाठीच आपण काम करतोय,” असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी खासदार संजय राऊत, पाचोऱ्यातील नेत्या वैशाली पाटील उपस्थित होत्या.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आर. ओ. तात्या पाटील हे आमचे आधार होते. आर. ओ. तात्यांचं निधन होणं, हे सर्वांवरती आघात होता. पण, आर. ओ तात्यांचं कार्य पूर्ण करण्याचा निश्चय वैशाली पाटील यांनी केला आहे. त्या दृष्टीनं वैशाली पाटील यांची पावले पडत आहेत.”
हेही वाचा : “संजय निरुपम कोण आहेत? काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत”, जागावाटपाबाबत संजय राऊतांचं विधान; म्हणाले, “आम्ही…”
“सत्ता ही सामान्य जनतेला आपली वाटली पाहिजे”
“सत्तेला घाबरणार असाल, तर उपयोग नाही. भीती वाटणारी सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्या जिद्दीनं मी उभा आहे. सत्ता ही सामान्य जनतेला आपली वाटली पाहिजे. सत्तेची भीती वाटत असेल, तर ती उलथवलीच पाहिजे. ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय. त्या कामात तुमच्यासारखे कार्यकर्ते सहभागी होत आहात. सगळ्याचं स्वागत करतो,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
“शिवसेनेला सत्तेची काळजी नाही”
यावेळी संवाद साधताना संजय राऊतांनी सांगितलं, “सत्ता आहे म्हणून लोक घाबरतात, असं नाही. शिवसेना सत्तेला लाथ मारते. शिवसेना सत्तेची काळजी करत नाही. सत्ता आहे म्हणून घाबरून शिवसेना एखादा निर्णय घेईल किंवा नाही घेईल, असं होत नाही. त्यामुळेच ती शिवसेना आहे.”