जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. पण, राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी आयत्यावेळी बंडखोरी करत शिंदे गटाकडून अर्ज दाखल करत विजय मिळवला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) आणि काँग्रेसवर आरोप केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. राष्ट्रवादीच्या १० मधील १ मत फुटलं. जिल्हा बँकेच्या निवडणुका लढवण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. तरीही सर्वांसाठी पुढाकार घेऊन बँक ताब्यात आणली. पण, शिवसेना आणि काँग्रेसने संजय पवारांना समर्थन केलं. महाविकास आघाडीत अशी अपेक्षा नव्हती. या लोकांनी विश्वासघात केला. त्यामुळे जिल्हा बँकेत आम्हाला धोका मिळाला.”
हेही वाचा : नितेश राणेंनी राहुल गांधींची दाऊदबरोबर केली तुलना; म्हणाले, “पाकिस्तान अन्…”
“संजय पवार हे राष्ट्रवादीचे असल्याचं मानायला तयार नाही. पाच ते सहा दिवसांपूर्वी संजय पवार गुलाबराव पाटलांच्या स्टेजवर होते. संजय पवारांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. संजय पवार विरोधकांशी हातमिळवणी करणार असल्याचा विषय अजित पवार आणि जयंत पाटलांच्या कानावर घातला होता,” असेही एकनाथ खडसेंनी सांगितलं.
“काँग्रेस आमच्याबरोबर राहिल हा विश्वास असल्याने संजय पवारांकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र, काही मते फुटली. ज्यांच्यासाठी परिश्रम घेतले, ते निवडणुकीत बरोबर राहिले नाहीत. सर्वांना एकत्र ठेवण्यात मला यश आलं नाही. आमच्यातच गद्दारी झाली,” अशी खंत एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : “…तर लोकसभेला कसे पराभूत झालात”, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला
“ही बँक आपल्यापासून दुसऱ्यांच्या ताब्यात जाणं ही बाब गंभीरतेने घेतली पाहिजे. त्यामुळे निश्चित संजय पवारांबाबत पक्षाने निर्णय घ्यावा, असा आग्रह धरणार आहे,” असं खडसेंनी स्पष्ट केलं.