जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील कासोदे येथील बंद अवस्थेतील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचा विषय शनिवारी होणाऱ्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत गाजण्याची चिन्हे आहेत. कारखान्याची विक्री करावी, अशी काही ज्येष्ठ संचालकांची इच्छा असताना आधीच्या विक्री व्यवहारात अडथळे आणणाऱ्यांना विरोध म्हणून नव्याने होणाऱ्या व्यवहाराला काहींचा विरोध होणे शक्य असल्याची चर्चा आहे.
कारखान्याकडे जिल्हा बँकेचे सुमारे ७१ कोटी रुपये घेणे आहेत. थकबाकी आणि वाढत गेलेल्या व्याजामुळे १५ वर्षांपूर्वी कारखाना बंद पडला. परिणामी बँकेची कर्जफेडही थांबली. अशा थकीत कर्जाच्या बोज्यामुळे जिल्हा बँकेने कारखाना जप्त करून आपल्या ताब्यात घेतला. कर्जवसुलीसाठी संचालक मंडळाने त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला. विक्रीसाठी बँकेने निविदा प्रसिद्ध केल्यानंतर त्यास प्रतिसाद मिळाल्याचे प्राप्त झालेल्या चार निविदांवरून स्पष्ट झाले. ८ मार्च रोजी या निविदा उघडल्या जाणार आहेत. या वेळी श्रद्धा एन्टरप्रायजेस, योगेश्वरी शुगर मॅन्युफॅक्चरिंग अॅण्ड डिस्टिलरी, जेबीएस पावर अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या मुंबईतील खरेदीदार संस्थांव्यतिरिक्त औरंगाबाद येथील समृद्धी शुगर यांनी निविदा दाखल केली आहे.
वसंत कारखाना विक्री प्रक्रिया पुन्हा एकदा म्हणजे गेल्या चार वर्षांत चौथ्यांदा सुरू झाल्याने जिल्हा बँकेच्या सत्ताधारी तसेच विरोधी संचालकांत वादाला तोंड फुटले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या संचालकांचे बहुमत असणाऱ्या बँकेत चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या मदतीनेच शिवसेनेचा संचालक बँकेचा अध्यक्ष झाल्याने सत्ताधारी कोण व विरोधी कोण हे समजणे कठीण झाले आहे. कारखाना विक्रीच्या पाश्र्वभूमीवर २३ फेब्रुवारी रोजी संचालकांची बैठक होणार असल्याने त्यात कारखाना विक्रीचे समर्थक कोण व विरोधक कोण, हे स्पष्ट होणार आहे. त्यातूनच कारखाना सुरू होईल की बंदच राहणार हे दिसून येईल; तथापि बँकेचे एक ज्येष्ठ संचालक काँग्रेसचे महेंद्रसिंग पाटील यांनी मात्र परिसर व उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी तसेच कामगार, ऊस उत्पादकांच्या हितासाठी कारखाना सुरू व्हावा, असे म्हटले आहे.
जिल्हा बँकेतर्फे कारखान्याची किंमत ७२.६९ हेक्टर जमिनीसह ३१ कोटी १० लाख रुपये ठरविण्यात आले आहे. त्यावरून यापेक्षा जास्त किमतीची निविदा असणाऱ्या खरेदीदाराच्या वाटय़ाला कारखाना जाईल हे निश्चित. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे बँकेचे अध्यक्ष असताना कारखाना विक्रीची प्रक्रिया एकदा पार पडली होती. त्या वेळी कारखान्याची मूळ किंमत २९ लाख रुपये ठरविण्यात आली असताना रावळ कंपनीने ३७ कोटी ५० लाख रुपयांना कारखाना घेण्याची तयारी दर्शविली होती. कारखाना लगेच सुरू करून स्थानिकांना रोजगार देण्याची अटही त्यांनी मान्य केली होती, पण काही संचालकांनी अडथळे आणल्याने रावळ कंपनीने त्यातून अंग काढून घेतले. जिल्हा बँकेचे एक संचालक खा. ईश्वरलाल जैन यांनीही मौनगिरी संस्थेच्या माध्यमातून कारखाना खरेदीचा प्रयत्न केला होता, पण सतीश पाटील यांनी तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नव्हता, अशी माहिती एका ज्येष्ठ संचालकांकडून सांगितली जाते. त्यानंतरच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जैन यांनी पाटील यांच्या नावाला जाहीरपणे केलेल्या विरोधातून तेच स्पष्ट होते. आता पुन्हा एकदा म्हणजे चार वर्षांत चौथ्यांदा कारखाना विक्रीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
‘वसाका’ विक्री विषयावर आज जळगाव जिल्हा बँक संचालकांची बैठक
जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील कासोदे येथील बंद अवस्थेतील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचा विषय शनिवारी होणाऱ्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत गाजण्याची चिन्हे आहेत. कारखान्याची विक्री करावी, अशी काही ज्येष्ठ संचालकांची इच्छा असताना आधीच्या विक्री व्यवहारात अडथळे आणणाऱ्यांना विरोध म्हणून नव्याने होणाऱ्या व्यवहाराला काहींचा विरोध होणे शक्य असल्याची चर्चा आहे.
First published on: 23-02-2013 at 05:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon district bank directors meeting today on vasaka sale subject