जळगाव पालिका घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित आ. सुरेश जैन यांची रवानगी गुरूवारी जळगावहून धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. सकाळी साडेआठच्या सुमारास एका रुग्णवाहिकेतून जैन यांना येथील कारागृहात आणण्यात आल्याने येथील कारागृहात ठेवण्यात आलेल्या संशयितांची संख्या आता पाच झाली आहे. १७ जानेवारी रोजी आ. सुरेश जैन यांच्या उपस्थितीत धुळे न्यायालयात या प्रकरणाचे पहिल्यांदाच कामकाज होणार आहे.
आ. जैन आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध हा खटला सुरू असून देवकर यांची न्यायालयीन कोठडी १७ जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. व्हिडिओ माध्यमातून चर्चेद्वारे न्यायालयीन कामकाजात भाग घेऊ देण्याची जैन यांची विनंती विशेष न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायााधीश आर. आर. कदम यांनी फेटाळून लावल्याने त्यांना धुळे जिल्हा कारागृहात येण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही. प्रकृती बरी नसल्याच्या कारणाचा हवाला देत न्यायालयीन कामकाजात सतत सहभाग न घेतल्याबद्दल जैन यांच्यावर विशेष न्ययाालयाने ताशेरेही ओढले होते. राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री देवकर यांच्यासह तीन जानेवारीला या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. प्रदीप रायसोनी, राजा मयूर, जगन्नाथ वाणी आणि शिवचरण ढंडोरे या चौघांना जळगाव कारागृहातून पोलीस बंदोबस्तात धुळ्याला हलविण्यात आले. या प्रकरणात जामीन मिळालेले अरूण शिरसोळे हेही न्यायालयात हजर झाले होते. यावेळी झालेल्या कामकाजात जैन यांचा प्रकृती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. आता जैन यांच्यासह अन्य संशयितांना १७ जानेवारी रोजी विशेष न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. घरच्या जेवणाची आणि औषधांची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती देवकर यांच्या वतीने मागण्यात आली होती. १७ जानेवारीला या विनंतीवर निर्णय होऊ शकेल.

Story img Loader