महापालिकेच्या ३७ प्रभागांमध्ये ७५ जागांसाठी ९०१ उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज पाहता वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेवर कब्जा करण्यासाठी सारेच इच्छुक जण सरसावल्याचे दिसत आहे. त्यातही महत्वाची बाब म्हणजे, खांदेश विकास आघाडी वगळता इतर कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. १६ ऑगस्ट ही अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत असल्याने तो पर्यंत गुडघ्याला बाशिंग बांधणारे कितीजण रिंगणात राहतील, ते स्पष्ट होईल.
जळगाव महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक एक सप्टेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीत आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी खांदेश विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे आणि समाजवादी पक्षाने स्वबळाचा नारा दिल्यामुळे सर्वानीच बंडखोरीच्या भीतीने आपापल्या याद्या जाहीर करण्यासाठी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवसच निश्चित केला होता. त्यामुळे अधिकृत, अपक्ष व हौशी उमेदवारांची शेवटच्या दिवशी अक्षरश: जत्रा भरली. शहरातील ३७ प्रभागातून ७५ नगरसेवक निवडून देण्यासाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तब्बल ९०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
त्यातही खान्देश विकास आघाडीकडून सर्वच सर्व ७५ उमेदवार देण्यात आले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी ६८ उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसने ६६ तर मनसेने ४८ तसेच समाजवादी पक्षाने २७ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. अन्य अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत.  त्यामध्येही अनेक विद्यमान नगरसेवकांचा समावेश असून त्यांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारल्याने दिसत आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी १६ ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. त्यावेळी कितीजण गळतात हे निश्चित होईल. त्यानंतर प्रभागनिहाय लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थकबाकीदारांचा मार्ग मोकळा
पालिकेच्या घरकुल आणि मोफत बससेवा अपहार व गैरव्यवहार प्रकरणी नुकसानीची जबाबदारी निश्चित करून महापालिका प्रशासनाने ९९ आजी-माजी नगरसेवकांना वसुलीची नोटीस बजावली होती. त्यामुळे थकबाकीदार ठरलेल्या नगरसेवकांना ही निवडणूक लढणे अवघड बनले होते. औरंगाबाद खंडपीठाने या वसुलीला स्थगिती दिल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon municipal elections 901 candidates have filed nomination for the 75 seats