महापालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. साडेतीन लाखाहून अधिक मतदार ४०५ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. मतदानासाठी ४३३ केंद्रे राहणार असून, त्यातील ४१ केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर झाली आहेत. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
महापालिकेची ही निवडणूक आमदार सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत होत असल्याने किमान त्यांच्यासाठी आणि त्यांच्या खानदेश विकास आघाडीसाठी अतिशय प्रतिष्ठेची ठरली आहे. यावेळी सत्ताधारी आघाडीविरोधात एकत्रितपणे लढण्याचे प्रयत्न झाले. परंतु, अतिमहत्वाकांक्षेमुळे सारे प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे जैन यांच्या आघाडी विरुद्ध सारे पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत.
जळगाव महापालिकेच्या ३७ प्रभागातून ३८ महिला आणि ३७ पुरूष असे एकूण ७५ नगरसेवक निवडले जाणार आहे. निवडणुकीसाठी २१९ महिला तर १८६ पुरूष उमेदवार रिंगणात आहेत.
सत्ताधारी खांन्देश विकास या आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील आघाडीचे सर्वाधिक ७३ उमेदवार रिंगणात असून भाजप ७०, राष्ट्रवादी काँग्रेस ६२, काँग्रेसने अधिकृत ४८ तर पुरस्कृत केलेले दहा, मनसे ४६, समाजवादी पक्षाने १८ उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात बहुरंगी लढत आहे.

Story img Loader