Devendra Fadnavis On Jalgaon Pushpak Express Train Accident : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे पुष्पक एक्सप्रेस गाडीने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा उडाल्याने रेल्वेतील प्रवासी खाली उतरले. परंतु त्यांना विरूद्ध बाजूने रेल्वे लाईनवरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने उडवले. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण गंभीर जखणी आहेत. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मृतांच्या वारसांना मदत देखील जाहीर केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. फडणवीस म्हणाले की, “जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”.
मुख्यमंत्र्यांनी दिली दिली अपडेट
“माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
यानंतर दुसऱ्या एका पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा देखील केली आहे. “जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असे फडणवीस त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
मध्य रेल्वेकडून काय सांगण्यात आलं?
मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, ” जळगावमध्ये लखनऊहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये पाचोरा स्टेशनजवळ, अलार्म चेन पुलिंगची घटना घडली. या घटनेनंतर काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने जात असलेली कर्नाटक एक्सप्रेस गाडी तेथून जात होती जिचा काही प्रवाशांना ट्रेनची धडक दिल्याची माहिती आम्हाला मिळाली”.
ते पुढे बोलताना म्हणाले की, “प्राथमिक माहितीनुसार, ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचारासाठी आम्ही जवळच्या रुग्णालयांची मदत घेतली आहे. कर्नाटक एक्स्प्रेसने आपला पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे आणि जखमी प्रवाशांना मदत मिळाल्यानंतर लगेच पुष्पक एक्स्प्रेस देखील आपला प्रवास पुन्हा सुरू करेल”.