Jalgaon Pushpak Train Accident Latest Updates : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पुष्पक एक्सप्रेस गाडीने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा पसरली आणि रेल्वेतील प्रवाशांनी उड्या मारल्या. मात्र विरूद्ध बाजूने येणाऱ्या रेल्वे लाईनवरून येणार्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे. अपघात कसा झाला याबाबत माजी खासदार उन्मेष पाटील यांनी माहिती दिली आहे.
परांडा हे रेल्वे स्थानक येण्याआधी नेमकं काय घडलं?
जळगावहून पुष्पक एक्सप्रेस निघाली होती, परांडा या स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण झालं आणि काही ठिणग्या उडाल्या. या पाहून एका प्रवाशाने आग लागली, आग लागली असं सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेतील ३५ ते ४० प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडलं. या अपघातात ७ ते ८ प्रवासी ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. एकाच डब्यातील लोकांनी या उड्या मारल्याचंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. दरम्यान, जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. रेल्वे प्रशासन आता घटनास्थळी पोहोचलं असून घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू करण्यात आल आहे. तर, जळगावच्या खासदार स्मिता वाघ याही घटनास्थळी रवाना झाल्या. त्यांनीही प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधत सूचना केल्या आहेत.
पुष्पक एक्स्प्रेसच्या अपघाताबाबत माजी खासदार उन्मेष पाटील काय म्हणाले?
“पुष्पक एक्सप्रेस ही भुसावळकडून मुंबईला येत असताना या गाडीने कॉशन ऑर्डर म्हणजे काम सुरू असल्याने स्टॉप घेतला होता. पण कॉशन ऑर्डर घेतली असताना स्टेशनला गाडी थांबवली तर सूचना देऊन प्रवाशांना कळतं की गाडी थांबली. काम सुरू आहे. पण ही गाडी स्टेशनजवळ न थांबवता जंगलात थांबवली. त्यामुळे काही प्रवासी खाली उतरले. एका बाजूला ब्लॉक होता. दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. ज्यावेळी प्रवाशांनी उड्या टाकल्या त्यावेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडलं.”
कॉशन ऑर्डर बाबत कर्नाटक एक्स्प्रेसला माहिती नसावी-उन्मेष पाटील
समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसला कॉशन ऑर्डरबाबत माहिती नसावी. कुठे तरी कम्युनिकेशन गॅप दिसतो. हॉर्न किंवा सिग्नल नसल्याने प्रवासी रेल्वे रुळांजवळ बसले होते. १० ते १२ प्रवासी होते. ज्यांना कर्नाटक एक्स्प्रेसने ऑन द स्पॉट उडवलं. आमचा कार्यकर्ते तिथे आहेत. मदत आणि बचाव कार्य करत आहेत. १२ जखमी प्रवाशांना पाचोऱ्याला शिफ्ट करण्यात आलं आहे, असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे. उन्मेष पाटील यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला त्यामध्ये ही माहिती दिली आहे.