जळगाव जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना शुक्रवारी (९ सप्टेंबर) रात्री अकराच्या सुमारास शहरातील मेहरुण परिसरात धक्कादायक प्रकार घडला. मेहरुण परिसरातील महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निवासस्थानावर एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाके, गुलाल उधळत दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अठरा संशयितांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापौरांच्या मोटारीच्या काचाही फोडल्या –

मेहरुण परिसरात महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निवासस्थानाजवळून एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात होती. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर महाजन यांच्या निवासस्थानावर गुलाल फेकत दगड व पेटते सुतळी बॉम्बसुद्धा फेकले. यानंतर कार्यकर्त्यांनी गणरायाची मूर्ती तिथेच सोडून देत पळ काढला. पळून जाण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी महापौर महाजन यांच्या मोटारीच्या काचाही फोडल्या. ही घटना घडली त्यावेळी महापौर महाजन घरी नव्हत्या. त्यांच्या जाऊबाई आणि नुकतीच शस्त्रक्रिया झालेले त्यांचे सासरे घरात होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर महाजन यांच्या निवासस्थानावर गुलाल उधळला. यावेळी महापौर महाजन यांच्या जाऊबाईंनी संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजावण्याचा प्रयत्न केला. घरात सासरे आजारी असल्याचेही सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गणरायाची मूर्ती विसर्जनासाठी रवाना करीत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, महापालिका सभागृह नेते ललित कोल्हे, गजानन मालपुरे, सरिता कोल्हे, मानसिंग सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत महापौर महाजन यांची भेट घेतली.

१८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल –

यासंदर्भात पूर्वेश यशवंत महाजन (वय 23, रा. विठ्ठल मंदिर महाजनवाडा, मेहरुण, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या घरासमोरून एका सार्वजनिक मित्रमंडळाची विसर्जन मिरवणूक वाजतगाजत जात होती. आमच्या घरात वयस्क व्यक्तीचे नुकतीच शस्त्रक्रिया झाली अहे. त्याचा त्यांना त्रास होत आहे. त्यामुळे तुमची मिरवणूक पुढे न्या, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्याचे वाईट वाटून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संशयित योगेश राजेंद्र नाईक, तेजस ज्ञानेश्‍वर वाघ, अजय संतोष सांगळे, मयूर बाळकृष्ण सांगळे यांच्यासह १८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिस्थिती हाताळली जात नसेल तर अधिकार्‍यांनी राजीनामे द्यावेत –

दरम्यान, मेहरुण परिसर अतिशय संवेदनशील असतानाही तिथे एकही पोलीस कर्मचारी नव्हता, तसेच घटना घडल्यानंतर तेथे दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यांनी पाहिणी केली. मात्र, त्यानंतरही त्यांनी ही घटना वरिष्ठांना कळविली नाही, असा आरोप महापौर महाजन यांनी केला आहे. शहराच्या प्रथम नागरिकांच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्‍न करीत जळगावातील कायदा व सुव्यवस्था संपली असून, पोलिसांकडून परिस्थिती हाताळली जात नसेल तर अधिकार्‍यांनी राजीनामे द्यावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon shiv sena mayors residence stone pelted with burning bombs by ganesh mandal activists msr