Jalgaon Pushpak Train Accident Latest Updates : जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये ११ प्रवाशांची मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ मदतकार्यक केले जात आहे.
११ मृत्यू ४ जण गंभीर जखमी
गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की कर्नाटक एक्सप्रेसने उडवल्याने ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी चार जणांचे मृतदेह पाचोरा येथे आहेत. तर आठ मृतदेह हे जळगावला पाठवण्यात आले आहेत. तसेच चार लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना वृंदावन या खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ७ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
परधाडे गावाजवळ ही घटना घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की आग लागल्याच्या अफवेने लोकांनी उड्या मारल्या. १५ ते २० मिनिटात प्रांत अधिकारी आणि कलेक्टर घटनास्थळी पोहचत आहेत. घटनास्थळी पोहचायला जळगावहून ३० ते ४० मिनिटं लागतात. पण जोपर्यंत इथं कोणी जाणार नाही तोपर्यंत हे लक्षात येणार नाही, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी टीव्हा९ शी बोलताना दिली.
जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
या दुर्घटनेबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमकडून माहिती देण्यात आली की, कर्नाटक एक्सप्रेसबरोबर एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये ७ ते ८ लोकांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आपण तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील पोहचले आहेत.रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत. ते एबीपी माझाशी बोलताना दिली.
ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय या तीन रुग्णालयाकडून मदत घेतली जात आहे. त्यामध्ये सर्व रुग्णांना मदत केली जात आहे असेही प्रसाद म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार, ६ ते ८ चा आकडा सांगितला जात आहे. अजून अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. सध्या आपली प्राथमिकता जखमींना उपचार देण्याची आहे, असेही आयुष प्रसाद म्हणाले.
रेल्वे आधिकाऱ्यांने सांगितलं नेमकं काय झालं?
मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, “जळगावमध्ये लखनऊहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये पाचोरा स्टेशनजवळ, अलार्म चेन पुलिंगची घटना घडली. या घटनेनंतर काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने जात असलेली कर्नाटक एक्सप्रेस गाडी तेथून जात होती जिचा काही प्रवाशांना ट्रेनची धडक दिल्याची माहिती आम्हाला मिळाली”.
ते पुढे बोलताना म्हणाले की, “प्राथमिक माहितीनुसार, ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचारासाठी आम्ही जवळच्या रुग्णालयांची मदत घेतली आहे. कर्नाटक एक्स्प्रेसने आपला पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे आणि जखमी प्रवाशांना मदत मिळाल्यानंतर लगेच पुष्पक एक्स्प्रेस देखील आपला प्रवास पुन्हा सुरू करेल”.