जालना : जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, त्यांनी तीनशेपेक्षा अधिक रहिवाश्यांना चावा घेतला आहे. अलीकडेच भवानीनगर भागात एका सात-आठ वर्षांच्या बालकावर कुत्र्याच्या हल्ल्यामुळे एकशे साठ टाके पडले आहेत. जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने (उद्धव ठाकरे) बुधवारी शहरातील अनेक नागरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महानगरपालिका कार्यालयासमोर यासंदर्भातील निवेदनाची होळीही करण्यात आली.

शहराच्या अनेक भागांत अंतर्गत जलवाहिन्याच नाहीत. यामुळे पाणी प्रश्न अधिक तीव्र झालेला आहे. महिन्यातून तीन दिवस याप्रमाणे वर्षातून ३५ दिवसच पाणीपुरवठा शहरास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जालना शहरातील नियमित स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, पाणीपुरवठ्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या जलकुंभांना संरक्षण द्यावे, मोकाट जनावरांमुळे अपघात होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, जन्म-मृत्यूचे दाखले वेळेवर द्यावेत, दूरच्या भागात असलेल्या मोठ्या वस्त्यांत नवीन स्मशानभूमींची उभारणी करावी, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, शहरप्रमुख बाला परदेशी, धनश्याम खाकीवाले आणि दुर्गेश कानोळीवाले यांच्यासह पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.

मोकाट कुत्र्यांची नसबंदी महानगरपालिकेने करण्याची आवश्यकता आहे. आताच तीव्र झालेला शहरातील पाणी प्रश्न उन्हाळ्याच्या पुढील काळात अधिक तीव्र होणार असल्याने त्यासंदर्भात योग्य नियोजनाची गरज आहे. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. – भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे)

जालना शहरातील भवानीनगर भागातील रस्त्यावर कार्तिक अंबादास थोरात या सात वर्षीय बालकावर मोकाट कुत्रे तुटून पडले आणि त्यांनी त्याचे लचके तोडले. त्या जखमांवरील उपचाराकरिता त्याला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करावे लागले, असे भास्कर अंबेकर यांनी सांगितले.

Story img Loader