जालना : विविध गुन्ह्यांचे आरोप असलेल्या अंबड तालुक्यातील सात आणि घनसावंगी तालुक्यातील दोन, अशा नऊ जणांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली. यामध्ये मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर यांचाही समावेश आहे. दरम्यान, सर्व समाजच आपला पाहुणा आहे. परंतु एखाद्या वेळेस आपले तोंड बंद करण्यासाठी हे षडयंत्र असेल, असा आरोप जरांगे याांनी यासंदर्भात केला आहे.
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करून विक्री करणे, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, इत्यादी गुन्हे तडीपार केलेल्यांवर दाखल आहेत. त्याचप्रमाणे यापैकी एकावर ऑनलाईन जुगार खेळविणे, धमक्या देणे आदी गुन्हेही दाखल आहेत. पोलिसांनी अंबड उपविभागीय कार्यालयाकडे तडीपारीचे २० प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी नऊ प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी तडीपारीची कारवाई केली.
तडीपार करण्यात आलेल्यांपैकी सात जण अंबड तालुक्यातील असून जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेले आंतरवाली सराटी गाव याच तालुक्यातील आहे. अंबड, घनसावंगी, गोंदी, पोलीस ठाण्याच्या वतीने तडीपारीच्या कारवाईचे हे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले होते.दरम्यान, या अनुषंगाने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, पाहुणे-रावळे आपल्याला समजत नाही. सर्व मराठा समाजच आपला पाहुणा आणि मायबाप आहे. मराठा आंदोलक म्हणून कुणाला नोटिसा देण्यात येत असतील तर ते चुकीचे आहे. मला बदनाम करण्यासाठी किंवा बोलणे बंद करण्यासाठी एखाद्या वेळेस हे षडयंत्र असू शकेल.
राज्यातील सहा कोटी मराठा समाज आपला पाहुणा आहे. समाजासाठी आपण कुटुंबालाही जवळ करती नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहित आहे. इतर पाहुण्यांनाही जवळ सुद्धा उभे राहू देणार नाही. राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. एकीकडे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे आंदोलकांना नोटिसा देण्याचे काम करायचे, असा आरोपही जरांगे यांनी सरकारवर केला.