जालना – अंबड तालुक्यातील भालगाव रस्त्यावर मंगळवारी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे या बिबट्याच्या चारही पायांचे पंजे कापून घेण्यात आलेले होते. बिबट्याच्या अंगावरील कातडी आणि दात मात्र, कायम होते. त्यामुळे चारही पायांचे पंजे का कापण्यात आले याचे गूढ निर्माण झाले आहे.
अंबड भालगाव रस्त्यावर शंकर राजाराम भोगने यांच्या शेताजवळ मृतावस्थेत आढळलेला बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती. यापूर्वी या परिसरात बिबट्या असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु वनविभागास बिबट्या सापडला नव्हता. मंगळवारी मात्र, अवस्थेतील नर बिबट्या आढळून आला. यासंदर्भात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत (१९७२) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृत बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर यासंदर्भातील काही माहिती समोर येईल. माहिती समजताच वनविभागाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाचे मुख्य वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली. हा प्रकार शिकारीचा असेल तर चारही पंजे का कापण्यात आले, असा प्रश्न पडला आहे.